हंसराज, प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, त्यांना राज्य सरकारने तातडीने कडेकोट सुरक्षा पुरवावी, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी उपसभापती हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.
आमदार रोहित पवार हे सध्या राज्यातील सत्ताधारी आणि विशेषतः अजित पवार गटाच्या संदर्भात सातत्याने धक्कादायक खुलासे करत आहेत. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणि राजकीय गौप्यस्फोटांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर, विरोधकांकडून त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याचे हिरालाल नागपुरे यांनी म्हटले आहे.
या संदर्भात बोलताना नागपुरे म्हणाले की, “आमदार रोहित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत सक्रिय असून जनतेच्या प्रश्नांवर आणि सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणांविरोधात निर्भीडपणे आवाज उठवत आहेत. सत्य बोलणाऱ्याचा आवाज दाबण्यासाठी सत्ताधारी कोणत्याही थराला जाऊ शकतात, ही शक्यता नाकारता येत नाही. रोहित पवार हे राज्याचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारची आहे.”
राज्य सरकारने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून राजकीय मतभेद बाजूला ठेवावेत आणि आमदार पवार यांना त्वरित ‘झेड’ श्रेणीची उच्चस्तरीय सुरक्षा उपलब्ध करून द्यावी. जर सरकारने त्यांच्या सुरक्षेबाबत टाळाटाळ केली आणि भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडली, तर त्याला पूर्णपणे राज्य सरकारच जबाबदार असेल, असा इशाराही हिरालाल नागपुरे यांनी दिला आहे.




