spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

६ वर्षांपासून रखडलेला बेला-सिरसी रोड तातडीने सुरू करा; शिवसेना (उबाठा) आक्रमक

– जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना धाडले निवेदन; शहरातील अपघातांचे सत्र थांबविण्याची मागणी

हंसराज भंडारा :- भंडारा शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अपघातांचे सत्र थांबविण्यासाठी सहा वर्षांपूर्वी मंजूर झालेल्या ‘बेला-सिरसी’ बाह्यवळण (बायपास) रस्त्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. या दिरंगाईविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन सादर केले आहे. हा रस्ता तातडीने सुरू करून शहरवासियांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ भंडारा शहराच्या मध्यभागातून जात असल्याने तुमसर, तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांटसह मध्य प्रदेशकडे जाणारी अवजड वाहतूक शहरातूनच होते. यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवर सतत वाहतूक कोंडी होऊन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा म्हणून २०२० मध्ये ‘बेला ते सिरसी’ हा बाह्यवळण मार्ग मंजूर करण्यात आला होता. तत्कालीन राज्य सरकारने या रस्त्यासाठी भूसंपादनाकरिता ३ कोटी रुपये आणि बांधकामासाठी २ कोटी रुपये असा एकूण ५ कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला होता. मात्र, ६ वर्षे उलटूनही या निधीतील एक रुपयाही खर्च करण्यात आला नाही की कामाला सुरुवात झाली नाही.

नेत्यांचे दुर्लक्ष आणि भूखंडांचे व्यवहार? शिवसेनेने दिलेल्या निवेदनात खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यास तुमसर, तिरोडा आणि मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या वाहनांचा किमान ४ ते ५ किमीचा फेरा वाचणार आहे. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी या महत्त्वाच्या प्रकल्पाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. काही नेत्यांनी या प्रस्तावित रस्त्यालगत स्वतःच्या नातेवाईकांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या नावे जमिनी खरेदी करून ठेवल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. निधी उपलब्ध असतानाही ‘कुठे माशी शिंकली’ असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

अपघातांच्या सत्राने जनक्षोभ मागील आठवड्यातच अदानी कंपनीच्या एका भरधाव टिप्परने शहरात मोटारसायकलस्वाराला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. अशा भीषण अपघातांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. बेला-सिरसी मार्ग झाल्यास ही अवजड वाहतूक शहराबाहेरून वळविणे शक्य होणार आहे. त्यामुळे हा रस्ता केवळ सोय नसून भंडारा शहरवासियांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अनिवार्य असल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.

यांची होती उपस्थिती जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख संजय भाऊ रेहपाडे, तालुकाप्रमुख तिलक सार्वे, शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक प्रशांत देशमुख, मयूर जोशी, राजेश ठवकर, प्रकाश निनावे, प्रकाश गभणे, सोमेश्वर सेलोकर, नदीम शेख, राज वधवानी, शामराव मालखंडाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते. प्रशासनाने यावर तातडीने कार्यवाही न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Popular Articles