spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्या – जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई :- NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात देशभरात झालेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर सुरू असलेली पोलीस कारवाई तात्काळ थांबवून त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)चे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे. परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवणे हे लोकशाही व्यवस्थेला शोभणारे नाही. पेपरफुटीसारख्या गंभीर गैरप्रकारांना जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवरच दडपशाही केली जात आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील आपल्या पत्रात म्हणाले आहेत की, NEET पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या अन्यायाविरोधात विद्यार्थ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन छेडले. त्यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन सरकारने दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र आता मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये तसेच देशातील इतर राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करणे, नोटिसा बजावणे आणि पोलिस कारवाई करण्याचे प्रकार सुरू आहेत. सरकारने दिलेल्या शब्दापासून फिरत विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या लोकशाही चळवळीची फसवणूक केल्याची खंत जयंत पाटील यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

बिहार आणि आसामप्रमाणे महाराष्ट्रातही परिपत्रक काढा

महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून राज्यातील आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घ्यावेत, त्यांच्यावरील पोलिस कारवाई तात्काळ थांबवावी तसेच अशी कोणतीही कारवाई करणार नाही असे परिपत्रक बिहार आणि आसाम राज्य सरकारने काढले आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यानेही परिपत्रक काढावे आणि सरकारने विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनाची प्रामाणिक अंमलबजावणी करावी, अशी मागणी जयंतराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटील काय काय म्हणाले?  

देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या गंभीर अन्यायाविरोधात महाराष्ट्रासह देशभरातील विद्याथ्यर्थ्यांनी शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांच्यावरील कोणतीही कायदेशीर कारवाई होणार नाही, तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास दिला जाणार नाही, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनांवर विश्वास ठेवून विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले. परंतु, सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये, तसेच देशातील इतर अनेक राज्यांमध्ये आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे, त्यांना नोटिसा बजावण्याचे आणि पोलिसांमार्फत त्यांची धरपकड करण्याचे प्रकार सुरू असल्याच्या घटना समोर येत आहेत.

सरकारने दिलेल्या शब्दाच्या पूर्णपणे विरोधात सुरू असलेली ही कारवाई विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा भंग करणारी असून त्यांच्या लोकशाही हक्कांवर घाला घालणारी आहे. परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवस्थेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगाराप्रमाणे वागवणे हे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेला शोभणारे नाही. ज्यांनी परीक्षेच्या पवित्र व्यवस्थेशी खेळ केला, त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अपेक्षित असताना न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच लक्ष्य केले जात आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी विचारांचे राज्य आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील भूमिका घेणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत, त्यांच्यावरील सर्व प्रकारची कायदेशीर, पोलिस कारवाई थांबविण्यात यावी आणि सरकारने दिलेल्या आश्वासनांची प्रामाणिक अंमलबजावणी करून कोणत्याही विद्यार्थ्यावर सूडबुद्धीने कारवाई केली जाणार नाही, याबाबत स्पष्ट निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात यावेत, ही आपणास नम्र विनंती आहे, असं जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Popular Articles