नागपूर :- नवीन गाडगेबाबा नगर येथे जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त ममता HIMC संस्थेच्यावतीने रिलीफ व्यसनमुक्ती केंद्रात एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात व्यसन सोडण्यासाठी उपचार घेत असलेल्या व्यक्तींनी उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व स्वागतपर भाषणाने झाली. या कार्यक्रमाला ममता HIMC संस्थेच्या राज्य समन्वयिका पल्लवी भांडारकर, समुपदेशक सुरभी पानपालिया, तसेच व्यसनमुक्ती केंद्राच्या नंदा अडमने उपस्थित होत्या. त्यांनी मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि व्यसनमुक्त जीवनाकडे जाण्याचा प्रवास याबद्दल मार्गदर्शन केले. समुपदेशक यांनी व्यसनाचे मानसिक परिणाम, त्यातून बाहेर पडण्यासाठी आवश्यक असलेले मानसिक बळ आणि सकारात्मक विचार यावर प्रकाश टाकला. “मानसिक स्वास्थ्य राखणे हे व्यसनमुक्ती प्रक्रियेतील पहिले आणि सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे.”
कार्यक्रमात सहभागी व्यसनी व्यक्तींनी आपले अनुभव कथन केले. त्यांनी मानसिक आरोग्याबाबत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे स्वतःमध्ये सकारात्मक बदल जाणवत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागींचा सन्मान करण्यात आला आणि मानसिक आरोग्य जपण्याची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमामुळे व्यसनमुक्ती केंद्रातील व्यक्तींमध्ये मानसिक आरोग्याबद्दल जागरूकता वाढली आणि आत्मविश्वासात भर पडली.



