– गवळी समाजाचा ओबीसी आरक्षणासाठी निर्धार:
– नागपूरच्या महामोर्चात समस्त गवळी विकास संस्थेचा सहभाग
नागपूर :- राज्यातील ओबीसी समाजाच्या घटनात्मक आरक्षणावर परिणाम करणाऱ्या २ सप्टेंबर २०२५ रोजी, महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी काढण्यात आलेल्या ‘सकल ओबीसी महामोर्चात ‘समस्त गवळी विकास संस्था, या राज्यव्यापी संस्थेने ठाम पाठिंबा दर्शविला आहे. हा विराट मोर्चा यशवंत स्टेडियम ते संविधान चौक दरम्यान काढला होता. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने ओबीसी समाजबांधव, सहभागी झाले होते. गवळी समाजानेही आपल्या प्रबळ उपस्थितीने आंदोलनात आपली भूमिका अधोरेखित केली. संस्थेच्या वतीने सांगण्यात आले की, ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय हक्कांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे. शासनाने केलेला काळा कायदा रद्द करण्यात यावा, अन्यथा हा अन्याय ओबीसी समाजापुरता मर्यादित राहणार नसून, भविष्यात इतर घटक समाजावरही याचे गंभीर परिणाम होतील, असा इशारा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. “आज त्यांच्या अधिकारांवर अन्याय होतोय, उद्या आमच्यावरही होईल. ही हुकूमशाही लोकशाहीला मारक आहे. त्यामुळे गवळी समाज रस्त्यावर उतरला आहे,” असे ठाम प्रतिपादन संस्थेचे प्रदेश अध्यक्ष इंजि. अशोक भाले यांनी यावेळी केले. गवळी समाज हा सध्या राज्य शासनाच्या ‘भटक्या जाती – ब’ प्रवर्गात मोडतो. मात्र केंद्र शासनाच्या ओबीसी यादीत त्यांचा समावेश आहे. त्यामुळे, राज्यातील ओबीसी आरक्षणात इतर जातींचा अतिरिक्त समावेश झाल्यास, सध्याच्या ओबीसी घटकांना मिळणाऱ्या सवलतींवर परिणाम होईल, असे निरीक्षणही गवळी समाजाच्या वतीने नोंदवण्यात आले. या ऐतिहासिक आंदोलनात “समस्त गवळी विकास संस्था” चे खालील प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते. इंजि.अशोक भाले, प्रदेश अध्यक्ष, प्रा.शैलेश हातबुडे (प्रदेश सरचिटणीस), इंजि.मदन साखरकर, विजय देशमुख, यादव लोहंबरे, दादाराव इटनकर नगरसेवक, प्रशांत हातबुडे, दयाराम थेटे, युवराज वानखेडे प्रमुख कार्यकर्ते या सर्वांनी गवळी समाजाच्या वतीने ‘सकल ओबीसी महामोर्चा’ मध्ये हजेरी लावत शासनाच्या निर्णयाला विरोध केला आणि ओबीसी आरक्षणाच्या समर्थनार्थ ठाम भूमिका घेतली. ओबीसी हक्कांसाठी गवळी समाज नेहमी अग्रभागी संस्थेने स्पष्ट केले की, यापुढेही ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात गवळी समाज आवाज उठवत राहील आणि घटनेने दिलेल्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी लढा देईल.




