spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

सत्तेच्या सावलीत न्यायाच्या शोधात… विधानभवनाबाहेर प्रिया फुके यांचे आंदोलन!  

 

मुंबई  ०७ : राज्याच्या राजधानी मुंबईत सोमवारी सकाळी एक धक्कादायक प्रसंग समोर आला, जेव्हा नागपूरच्या प्रिया फुके या आपल्या दोन लहान मुलांसह थेट मुंबईतील विधानभवनाबाहेर ठिय्या आंदोलनाला बसल्या. त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची कहाणी प्रसारमाध्यमांसमोर मांडत न्यायासाठी गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या संघर्षाची हकीकत मांडली. त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर जोरदार टीका केली असून, सत्तेच्या पातळीवरही न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली. मात्र आंदोलन सुरू असतानाच मुंबई पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. प्रिया फुके यांनी सांगितले की, त्या गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी ठामपणे म्हटले, “मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्यक्ष भेट घ्यायची आहे.” महिला आयोग, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेतृत्व यांच्याकडे वारंवार निवेदने दिली गेली, परंतु अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याने त्यांचा संयम सुटला आहे. “माझ्यावर अन्याय झाला आहे, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, आता मी गप्प बसणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला. त्यांच्या या आक्रमक आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, विरोधकांनी यावरून सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली आहे. भाजपकडून अद्याप यावर कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप करत प्रिया फुके यांनी आता थेट कायदेशीर लढाईचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. ही लढाई केवळ वैयक्तिक नसून, महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. न्यायव्यवस्था, प्रशासन आणि राजकीय यंत्रणा या सर्वांकडून वारंवार दुर्लक्षित केल्याचा अनुभव त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडला आणि महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न या आंदोलनातून अधोरेखित झाला.

Popular Articles