– महापौर निता ठाकरे यांनी दाखविली निर्माल्य रथांना हिरवी झेंडी
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेने शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शहरात ४१९ कृत्रिम विसर्जन कुंडाची निर्मिती केली आहे. या विसर्जन कुंडांचे लोकार्पण महापौर निता ठाकरे यांच्या हस्ते फुटाळा तलाव परिसरात झाले. त्याचप्रमाणे गणेशोत्सव काळात जमा होणारे निर्माल्याचे संकलन करण्यासाठी मनपाने १८ निर्माल्य रथ तयार केले आहेत. या निर्माल्य रथांना सुद्धा महापौर निता ठाकरे यांनी मनपाच्या मुख्यालयात हिरवी झेंडी दाखविली.
मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या परिसरात आज (ता. १४) निर्माल्य संकलनातून पर्यावरण व्यवस्थापन लोकजागृती अभियानाअंतर्गत निर्माल्य रथांना हिरवी झेंडी दाखवून महापौर निता ठाकरे यांनी लोकार्पण केले. यावेळी उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेता नरेंद्र (बाल्या) बोरकर, आरोग्य समितीच्या सभापती मनीषा अतकरे, आयुक्त डॉ. विपीन, नगरसेवक योगेश पाचपोर, नगरसेवक अभिजीत झा, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम., उपायुक्त राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी स्वप्नील लोखंडे उपस्थित होते.

शहरात गणेशोत्सवाचे आगमन झाल्यानंतर गणेश विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावे, यासाठी मनपाचे शहरातील विविध ठिकाणी ४१९ वर कृत्रिम तलाव तयार केले आहेत. मोठ्या आकाराच्या गणेशाच्या मूर्तीच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलीस लाईन टाकळी, लकडगंज भागातील कच्छी विसा व कोराडी येथे मोठे तलाव बांधले आहेत. परंतु श्री गणेशाच्या लहान मूर्तीच्या विसर्जनासाठी शहरात विविध भागात कृत्रिम तलाव तयार केले आहेत.
कृत्रिम तलावांचा वापर करावा- महापौर
यावेळी बोलताना महापौर निता ठाकरे म्हणाल्या, शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या उत्साहाने श्री गणेशाचा आगमन झाले आहे. दीड दिवसानंतर श्री गणेशाच्या मूर्तीच्या विसर्जनाला सुरूवात होते. नागरिकांनी मूर्तीचे विसर्जन तलाव, विहिरी किंवा नाल्यात करण्याऐवजी मनपाने तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करावे. यामुळे नैसर्गिक जलस्त्रोत प्रदूषित होणार नाही. यासाठी डीजीटल पद्धतीने नागरिकांना कृत्रिम तलावांची माहिती सुद्धा मिळणार आहे.
कृत्रिम तलावांची माहिती मोबाईलवर
शहरात कृत्रिम तलाव कुठे आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. कृत्रिम विसर्जन तलाव शोधा, यासाठी मनपाने क्यूआर कोड आणि संकेतस्थळ
https://ganpati-zone-map.emergent.host तयार केला आहे. हा क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन केल्यानंतर आपल्या घराजवळ कुठे कृत्रिम तलाव आहे. याची माहिती झोननिहाय मिळेल तसेच तेथे जाण्यासाठी दिशादर्शक गुगल मॅप सुद्धा उपलब्ध राहणार आहे. क्यूआर कोड मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंदर्भात मनपाने तयार केलेल्या फलकांचे प्रकाशन महापौर निता ठाकरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाले.
निर्माल्य रथासाठी टोल फ्री नंबर
निर्माल्य रथासंदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी नागरिकांसाठी मनपाने 1800 2677 966 हा टोल फ्री लोकांसाठी उपलब्ध केला आहे.





