– शेतीची सुपीकता आणि जलसाठा वाढवण्यासाठी लोकसहभागातून अभियान राबविण्याचे आवाहन
हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- शेतकरी हित, मृद व जलसंधारण आणि शेती उत्पादन वाढीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार’ तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरण योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज भंडारा जिल्हा नियोजन समिती सभागृहात नियोजनात्मक कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान आमदार डॉ. परिणय फुके यांनी भूषविले.
ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाकांक्षी संकल्पना असून, केवळ पाणी साठवण वाढविणेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या शेतात गाळ टाकून जमिनीची सुपीकता वाढवून उत्पादन खर्च कमी करण्याच्या दृष्टीनेही ही योजना अत्यंत उपयुक्त असल्याचे आ. डॉ. परिणय फुके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले.

कार्यशाळेत तलाव व धरणांमधील गाळ काढण्याची संपूर्ण प्रक्रिया, त्या गाळाचा शेतकऱ्यांच्या शिवारात वैज्ञानिक पद्धतीने वापर केल्यास जमिनीतील सेंद्रिय घटक कसे वाढतात, पिकांची उत्पादकता कशी सुधारते तसेच नाला खोलीकरण व रुंदीकरणामुळे पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी कशी वाढविता येईल व पूर्बपरस्थितीवर मात करता येईल याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
ही योजना मृद व जलसंधारण विभागामार्फत राबविण्यात येत असून, यामध्ये ग्रामपंचायती, सरपंच, सचिव, तसेच स्थानिक अशासकीय संस्थांचा सक्रिय सहभाग अत्यावश्यक असल्याचे आ. डॉ. परिणय फुके यांनी नमूद केले. प्रत्येक गावाने गरजेनुसार नियोजन करून प्रस्ताव सादर करावेत, कामे वेळेत सुरू करावीत आणि कोणत्याही अडचणी उद्भवल्यास तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणाव्यात, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
गाळ काढण्याच्या कामात येणाऱ्या तांत्रिक, प्रशासकीय व समन्वयाच्या अडचणींचा आढावा घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच ‘गाळयुक्त शिवार’ योजनेची प्रलंबित कामे त्वरित सुरू करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. 2025-26 या वर्षात जिल्ह्यातील 65 तलावातून जवळपास 5 लक्ष घ.मी. गाळ काढण्यात आल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे, हे विशेष.
या कार्यशाळेस मिलिंदकुमार साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, योगेंद्र सिंह , उपवनसंरक्षक, अनंत जगताप,प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, नागपूर; राजेंद्र कुमार जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी, भंडारा, महेश सेलुकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी, भंडारा; सुमित नागदेवे, सहा. जिल्हा जलसंधारण अधिकारी तसेच प्रफुल्ल सुतार (टाटा मोटर्स) यांच्यासह जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व विविध अशासकीय संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








