spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

तुमसर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; मेहेगाव येथील खुनाचा २४ तासांत उलगडा

– रामटेकमध्ये सापळा रचून तीन आरोपींना ठोकल्या बेड्या; तांत्रिक तपासाचे मोठे यश

हंसराज, प्रतिनिधी भंडारा तुमसर :- तुमसर तालुक्यातील मेहेगाव येथे घडलेल्या कपील गणेश राणे (२८) या तरुणाच्या निर्घृण हत्या प्रकरणाचे गूढ उकलण्यात तुमसर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या २४ तासांत यश आले आहे. अज्ञात आरोपींनी केलेल्या या खुनाचे आव्हान स्वीकारत पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून तीन आरोपींना अटक केली आहे. भूषण सुनील लांजेवार (१९, मेहेगाव), सार्थक नंदकिशोर कठारे (२०, टेंभरी जि. नागपूर ) आणि निलेश नरेश नागगोते (१९, रामटेक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

मेहेगाव येथील फिर्यादी पंकज गणेश राणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २२ जानेवारीच्या रात्री ८ वाजेपासून ते २३ जानेवारीच्या दुपारपर्यंतच्या दरम्यान कपील राणे यांची हत्या करण्यात आली. गावापासून ३ किमी अंतरावर कपील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला होता. त्यांच्या डोक्यावर, गळ्यावर आणि कुशीवर धारदार शस्त्राने अनेक वार करून अत्यंत निर्घृणपणे हा खून करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास काळे यांनी तातडीने तुमसर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेची (LCB) स्वतंत्र पथके तैनात केली. आरोपींनी कोणताही पुरावा मागे ठेवला नव्हता, मात्र पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सायबर सेलची मदत घेतली. तपासादरम्यान संशयितांचे लोकेशन नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात आढळले. त्यानुसार पोलिसांनी तेथे धाड टाकून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली तुमसरचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक नितीन चिंचोळकर, सहायक पोलीस निरीक्षक सोनवाने, उपनिरीक्षक प्रवीण सयाम, श्रीचंद गंगवानी यांच्यासह पोलीस कर्मचारी बळदे, टिळक चौधरी, राजकुमार गिरीपुंजे, विजय दमाहे, अजय बावणे, नितीन झंझाळ आणि निखिल बिसने यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सयाम करीत आहेत.

“गुन्हा कितीही हुशारीने केला तरी आरोपी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही, हे तुमसर पोलिसांनी आपल्या जलद तपासातून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.