spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रस्त्यावरून चालताना आता नेहमी उजव्या बाजूनेच चाला !

– भंडारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा ‘Walk on Right’ उपक्रम; शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती.

हंसराज, प्रतिनिधी भंडारा :- रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भंडारा मार्फत जिल्ह्यात विशेष रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज २४ जानेवारी रोजी ‘Walk on Right’ (नेहमी उजव्या बाजूने चाला) या जीवनरक्षक संकल्पनेवर भर देत शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले.

भंडारा येथील सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सागर सराफ आणि मेघाराणी काशिद यांनी आज मोहदुरा येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तसेच गोपीवाडा येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

सामान्यतः नागरिक रस्त्याच्या डाव्या बाजूने चालतात. मात्र, ज्या रस्त्यांवर पदपथ (Footpath) नाहीत, तिथे उजव्या बाजूने चालणे कसे फायदेशीर आहे, याचे तांत्रिक विश्लेषण अधिकाऱ्यांनी यावेळी केले. उजव्या बाजूने चालल्यामुळे समोरून येणारे वाहन पादचाऱ्याला स्पष्ट दिसते, ज्यामुळे संभाव्य धोका ओळखून वेळीच बाजूला होणे शक्य होते. याउलट डाव्या बाजूने चालताना पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज येत नाही. ग्रामीण भागातील अरुंद रस्त्यांवर ही पद्धत अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी पटवून दिले.

यावेळी परिवहन विभागाच्या अत्याधुनिक ‘इंटरसेप्टर’ वाहनाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या वाहनातील वेग मोजणारी यंत्रे आणि इतर उपकरणांची माहिती घेताना विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता दिसून आली. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची सामूहिक शपथही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आली.

तज्ज्ञांचे आवाहन

“रस्ते अपघात टाळण्यासाठी केवळ चालकांनीच नाही, तर पादचाऱ्यांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. ‘Walk on Right’ ही छोटीशी सवय अनेक मौल्यवान जीव वाचवू शकते,” असे मत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सागर सराफ व मेघाराणी काशिद यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाला दोन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिवहन विभागाने राबविलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Popular Articles