spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आंधळगाव पोलिसांचा अवैध वाळू माफियांना दणका; ५० लाखांच्या टिप्परसह ५०.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

– खैरलांजी फाट्यावर अवैध रेती वाहतुकीवर कारवाई; दोघांवर गुन्हा दाखल

हंसराज, प्रतिनिधी भंडारा आंधळगाव :- मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस स्टेशनच्या पथकाने अवैध रेती उपसा आणि वाहतुकीविरोधात कडक पाऊल उचलले आहे. खैरलांजी फाटा येथे करण्यात आलेल्या धडक कारवाईत पोलिसांनी अवैध रेतीची वाहतूक करणारा एक टिप्पर पकडला असून, ५० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालक आणि टिप्पर मालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंधळगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी खैरलांजी फाटा परिसरात गस्तीवर असताना, त्यांना एका पांढऱ्या रंगाच्या अशोक लेलँड कंपनीच्या टिप्परची (क्रमांक MH-34 BZ-1638) हालचाल संशयास्पद वाटली. पोलिसांनी टिप्पर थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये अंदाजे १२ ब्रास रेती विनापरवाना आणि अवैध मार्गाने वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. हा टिप्पर मालक ‘आरमॅको इन्फ्रालिंक्स प्रायव्हेट लिमिटेड’ (ARMACO INFRALINKES PRIVATE LIMITED) या कंपनीच्या मालकीचा असून, मालकाच्या सांगण्यावरूनच ही अवैध वाहतूक सुरू असल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी या कारवाईत ५० लाख रुपये किमतीचा टिप्पर आणि ७२ हजार रुपये किमतीची रेती, असा एकूण ५० लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चालक गणेश तिलकचंद मात्रे (वय ४०, रा. मानकापूर गंगा नगर, नागपूर ग्रामीण) आणि टिप्पर मालकावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ४९, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८(८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम १५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शहारे, पोलीस शिपाई वैद्य व आंधळगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. प्रकरणाचा पुढील तपास आंधळगाव पोलीस करीत आहेत.

Popular Articles