spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आद्यब्रह्मवादिनी नागपूर तर्फे आयोजित ‘गुरुकुल-हसत खेळत मराठी’ या उपक्रमाचा शुभारंभ

नागपूर :- दीनदयाल नगर येथील श्री पांडुरंगेश्वर मंदिरातील सभा मंडपात आद्यब्रह्मवादिनी फाऊंडेशन नागपूर च्यावतीने ‘गुरुकुल- हसत खेळत मराठी’ या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा, रविवारी ६ सप्टेंबर रोजी, मोठ्या उत्साहात पार पडला. सप्टेंबर ते जानेवारी या कालावधीत दर रविवारी घेण्यात येणाऱ्या या उपक्रमाची संकल्पना आद्यब्रह्मवादिनी फाउंडेशनच्या संस्थापिका डॉ. वृषाली शिलेदार यांची असून या उपक्रमाच्या मुख्य सल्लागार प्रमुख संचालिका जयश्री धर्माधिकारी आहेत. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पांडूरंगेश्वर शिवमंदिर मंडळाचे अध्यक्ष दिलीप कातरकर आणि डॉ. वृषाली शिलेदार यांच्या सोबत सहसंस्थापिका डॉ. योगिता कस्तुरे संचालिका आरती महाजन आणि मंदिराचे सचिव दीपक पथे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी संचालिका डॉ. मेघा जोशी व अरुंधती महाजन प्रामुख्याने उपस्थित होत्या. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षांचे पुष्पगुच्छ देऊन डॉ. वृषाली शिलेदार यांनी स्वागत केले. प्रमुख संचालिका आरती महाजन यांनी आद्यब्रह्मवादिनीच्या विविध क्षेत्रातील बहुमूल्य कार्याची आणि संस्थेच्या भारतभर पसरलेल्या शाखांची माहिती दिली. अभिजात मराठी ही सक्तीचा विषय म्हणून अभ्यासक्रमात शिकताना पालक आणि पाल्य दोघेही दडपण घेतात शिवाय मुलं आपलीच भाषा बोलतांना अडखळतात हे ओळखून हाती घेतलेल्या या उपक्रमाच्या स्वरूपाची आणि उद्देशाची माहिती संयोजिका डॉ. ज्योती शिवलकर यांनी दिली. आपल्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष दिलीप कातरकर यांनी गुरुकुल या संकल्पनेत समाविष्ट मूल्याधिष्ठित शिक्षणाची भावना समृद्ध व्यक्तिमत्व घडवण्यासाठी किती महत्वाची आहे आणि कॉन्व्हेन्ट मधील उच्चपगार केंद्रित शिक्षणपद्धत किती संकुचित दृष्टिकोन शिकवते हे स्पष्टपणे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सीमा घिसाड यांनी तर आभार संयोजिका सुनीती मोहरील यांनी मानले. द्वितीय सत्रात जेव्हा ९ ते १२ वयोगटातील सहभागी मुलामुलींनी आत्मविश्वासाने आपला अल्प परिचय करुन दिला, तेव्हा त्यांच्या बोलण्यातून ‘हसत खेळत मराठी’ या उपक्रमाचा मुलांना खूपच उपयोग होईल हे प्रकर्षाने जाणवले. या उपक्रमासाठी ९ ते १२ वयोगटातील ३८ मुलामुलींची नोंदणी झाली आहे. याप्रसंगी आद्य ब्रह्मवादिनी च्या कार्यकर्त्या अबोली भाटवडेकर, उज्वला गोळे, हेमांगी जोशी, शिल्पा नाईक, मानसी देशपांडे, कविता मोहरील, अर्चना साने, प्रज्ञा बेहेरे, सुवर्णा आशिरगडे अश्विनी उपाध्ये, सविता जोशी, सरिता पुराडभट आणि इतर सख्यांचे तसेच शिवमंदिर मंडळातील उपस्थित सदस्यांचे सहकार्य लाभले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.