खापा, वार्ताहर :- नागपूरहून मध्यप्रदेशातील छिंदवाडाकडे भरधाव वेगाने जाणारी पिकअप गाडी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बसला धडकली. या अपघातात चालक आणि सहा प्रवासी जखमी झाले. सर्वांना तातडीने नागपूर वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी (दि.२५) सकाळी ८ वाजता बडेगाव-सिंदेवानी रस्त्यावरील रायवाडी शिवारात ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, बस चालक नितेश गरीबा बोरकर (३४), खैरी (पंजाब), ता. सावनेर येथील रहिवासी आणि कंडक्टर सुरेंद्र दिगंबर महाजन, अमरावती येथील रहिवासी हे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता एसटी बस स्टँडवरून नागपूरहून रामाकोना (मध्य प्रदेश) येथे बस क्रमांक एमएच ४०, ए क्यू ६३१२ ने प्रवाशांना घेऊन निघाले. ते रात्री ९:५० वाजता रामकोना येथे पोहोचले आणि तिथेच रात्रभर थांबले. शनिवारी सकाळी ७ वाजता उर्वरित प्रवाशांसह बस रामकोनाहून नागपूरला निघाली. दुसरीकडे, नागपूरहून अंडी भरलेल्या यु.पी.९४ ऐ.टी. २०७७ क्रमांकाच्या पिकअपच्या चालकाचे वेग जास्त असल्याने नियंत्रण सुटले आणि पिकअप विरुद्ध दिशेने बडेगाव मार्गे मध्यप्रदेश जात होता. दरम्यान, रामकोना-नागपूर एसटी बसशी समोरासमोर धडकली. या अपघातात बसचालकासह ६ प्रवासी जखमी झाले. प्रवासामध्ये जखमी झालेले १) सिध्दार्थ बबनराव कोटानगंडे वय ४५ वर्ष, २) कल्पना सिध्दार्थ कोटानगंडे वय ४२ वर्ष दोन्ही रा. बाराखोली, इंदोरा रा. नागपुर ३) नेहा सुनिल कावरकर वय २६ वर्ष, ४) वैशाली सुनिल कावरकर वय ४५ वर्ष ५) गौरव सुनिल कावरकर वय २२ वर्ष सर्व रा. गंजीपेट गांधी चौक नागपुर अशी प्रवाशी जखमी नावे आहे. बसला धडक दिल्यानंतर पिकअप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडालाही धडकली. यामध्ये पिकअप चालकही जखमी झाला. गाडीत भरलेली अंदाजे ३ लाख रुपयांची अंडीही फुटल्याचे सांगण्यात येत आहे. बसचालक बोरकर यांच्या तक्रारीवरून खापा पोलिस ठाण्यात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार किशोर भुजाडे यांच्या मार्गदर्शनात खामेश्वर बाम्बल, संतोष परतेती पुढील तपास करत आहेत.




