नवी दिल्ली ५ : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर रशियन तेल खरेदीसंदर्भात टिका करत “टॅरिफ मोठ्या प्रमाणात वाढवण्याची” धमकी दिल्यानंतर भारताने जोरदार प्रतिक्रिया देत अमेरिकेच्या आणि युरोपीय संघाच्या दुहेरी भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी उशिरा दिलेल्या अधिकृत वक्तव्यात सांगितले की, “भारताला अनुचित आणि अन्यायकारकपणे लक्ष्य केले जात आहे. हे विशेषतः हास्यास्पद आहे, कारण जे देश भारतावर टीका करत आहेत, तेच स्वतः मोठ्या प्रमाणात रशियासोबत व्यापार करत आहेत.”
भारताने स्पष्ट केले की 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर, पारंपरिक तेल पुरवठा युरोपकडे वळवला गेला आणि त्यानंतरच भारताने रशियन तेलाचा पर्याय स्वीकारला. यामागे राष्ट्रीय आर्थिक सुरक्षा आणि उर्जेची गरज होती, कोणतेही राजकीय कारण नव्हते, असे भारताने स्पष्ट केले.
युरोपियन युनियनचा रशियासोबतचा व्यापार 2024 मध्ये 67.5 अब्ज युरो होता, तर सेवा व्यापार 2023 मध्ये 17.2 अब्ज युरो इतका होता. भारताने नमूद केले की, “युरोपीय युनियनचा रशियाशी व्यापार भारताच्या एकूण व्यापारापेक्षा अनेक पटीने अधिक आहे, तरीही भारतावरच टिका केली जाते, हे दुहेरी निकषांचे लक्षण आहे.”
भारत-रशिया दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार मार्च 2025 मध्ये $68.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचला असून, कोविडपूर्वीच्या $10.1 अब्ज डॉलर्सच्या तुलनेत जवळपास 5.8 पट वाढ झाली आहे. तथापि, युरोपीय संघ 2024 मध्ये रशियाचा तिसऱ्या क्रमांकाचा व्यापार भागीदार राहिला असून, 2020 मध्ये तो पहिला होता.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अलीकडेच एका सोशल मीडिया पोस्टमध्ये भारताला इशारा देत सांगितले की, 25 टक्के टॅरिफ लावण्यात येणार आहे, शिवाय आणखी कठोर “दंडात्मक कारवाई”ही होणार असल्याचे संकेत दिले. त्याचबरोबर भारत रशियन तेल सवलतीने घेऊन खुल्या बाजारात नफा कमावत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
अमेरिकेच्या या भूमिकेवर टीका करत भारताने म्हटले, “आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या नावावर हे दुटप्पी धोरण आहे. आमच्या गरजांमुळे आम्ही रशियन तेल घेतो, तर टीका करणारे देश स्वतःसाठी फायदेशीर असलेले व्यवहार करत राहतात.”
आता या प्रकरणावरून जागतिक राजकारणात व्यापार, ऊर्जा सुरक्षा आणि नैतिकतेच्या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून, भारताने दिलेला खुलासा आणि पलटवार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले परिपक्व आणि स्वाभिमानी धोरण अधोरेखित करत आहे.
@filephoto




