spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भारत आणि सेशेल्सचे संबंध मैत्रीपूर्ण आणि धोरणात्मक – सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी

– दोन्ही देशांतील संवादातून विकासाच्या नव्या संधीचे दालन उघडणार

 मुंबई :- भारत आणि सेशेल्सचे संबंध हे मैत्रीपूर्ण, धोरणात्मक आहेत. दोन्ही देश हे हिंद महासागरातील महत्त्वाचे सागरी देश असून दोन्ही देशातील व्यावसायिक संबध अधिक बळकट करण्यावर आम्ही भर देत आहोत. व्यावसायिक परिषदेच्या माध्यमातून विकासाच्या संधी अधिक वाढतील ज्या दोन्ही राष्ट्रांसाठी महत्वपूर्ण ठरतील, अशी आशा सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांनी व्यक्त केली.

सेशेल्स प्रजासत्ताकचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी व सेशेल्स प्रजासत्ताकच्या प्रथम महिला व्हेरॉनिक हर्मिनी यांचे शिष्टमंडळ भारत भेटीवर आहेत. या भेटीदरम्यान भारतीय उद्योग महासंघ आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्यावतीने हॉटेल ताज येथे भारत आणि सेशेल्स व्यावसायिक परिषद बैठक आयोजित केली होती. यावेळी सेशेल्स या देशाचे अर्थमंत्री (आर्थिक नियोजन, व्यापार व गुंतवणूक) पिअर लापोर्ते, परराष्ट्र व्यवहार मंत्री बॅरी फॉली, भारत सरकारचे केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्रालयाचे सचिव विजय कुमार, मुंबई बंदर प्राधिकरणचे अध्यक्ष एम.अंगामुथू आणि आणि जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणचे अध्यक्ष गौरव दयाल, भारतीय उद्योग महासंघाचे (CII) प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी म्हणाले की,दोन्ही देश सागरी क्षेत्र,आरोग्य व शिक्षण,ऊर्जा या क्षेत्रात व्यावसायिक दृष्ट्या नाविन्यपूर्ण संकल्पना विकसीत करत आहेत.आज सेशेल्समध्ये हजारो भारतीय वंशाचे नागरिक वास्तव्यास असून,त्यांनी सेशेल्सच्या सामाजिक व आर्थिक जडणघडणीत मोलाचे योगदान दिले आहे. पन्नास वर्षांहून अधिक काळापासून विविध क्षेत्रांमध्ये भारत व सेशेल्स संयुक्तरित्या काम करत आहेत.एक लहान बेटराष्ट्र म्हणून, जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेल्या भारताने केलेल्या उल्लेखनीय प्रगतीकडे सेशेल्स अत्यंत आदराने पाहतो.शाश्वत विकास आणि समृद्धीकडे वाटचाल करत असताना भारताच्या अनुभवातून आम्हाला खूप काही शिकण्यास मिळत आहे असेही ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल म्हणाले की, भारत आणि सेशेल्स मध्ये हिंद महासागर ओलांडून व्यापार व संस्कृतींची देवाणघेवाण होत आहे. शिक्षण, आरोग्यसेवा, सागरी सुरक्षा तसेच आपत्ती प्रतिसाद या क्षेत्रांमध्ये स्थानिक गरजा आणि दीर्घकालीन शाश्वततेला केंद्रस्थानी ठेवून दोन्ही देशांमधील सहकार्य वृध्दींगत केले जात आहे.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली या भागीदारीला नव्याने गती मिळाली आहे असेही ते म्हणाले.

सेशेल्स या देशाचे अर्थमंत्री (आर्थिक नियोजन, व्यापार व गुंतवणूक) पिअर लापोर्ते म्हणाले की,डिजिटल -सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये भारताच्या नेतृत्वाचे आम्ही स्वागत करतो.नवीकरणीय ऊर्जा, विशेषतः सौरऊर्जा,सेवा क्षेत्र, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, दूरसंचार आणि रिअल इस्टेट विकास इत्यादी क्षेत्रांमध्ये भागीदारी केली तर सर्व समावेशक विकास आणि आधुनिक शहरी उभारणीस हातभार लागू शकतो. पर्यटन व आदरातिथ्य, ब्लू इकॉनॉमी विशेषतः मत्स्यव्यवसाय, वित्तीय क्षेत्र व फिनटेक, शिक्षण, हरित ऊर्जा (जसे ई-बससाठी सौर तंत्रज्ञान), तसेच चित्रपट उद्योग या क्षेत्रांमध्येही मोठी क्षमता आम्हाला दिसते.सेशेल्स हे व्यवसायासाठी खुले आहे. एक स्थिर, जागतिक स्तरावर जोडलेले आणि गुंतवणूक-अनुकूल वातावरण आमच्या देशात आहे असे ते म्हणाले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.