Home Latest News शुल्क भरूनही माहिती मिळेना; डोंगरला ग्रामपंचायतीचा कारभार रडारवर अर्जदारांची गटविकास अधिकारी व राज्य...

शुल्क भरूनही माहिती मिळेना; डोंगरला ग्रामपंचायतीचा कारभार रडारवर अर्जदारांची गटविकास अधिकारी व राज्य माहिती आयोगाकडे धाव

0
26

हंसराज,तुमसर :- पंचायत समिती तुमसर अंतर्गत येणाऱ्या डोंगरला ग्रामपंचायतीचा कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे माहिती अधिकार कायद्यांतर्गत रीतसर शुल्क भरूनही विहित मुदतीत माहिती उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप अर्जदारांनी केला आहे. याप्रकरणी सुनील पटले आणि कैलास बनकर यांनी तुमसरच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे प्रथम अपील दाखल केले असून, बनकर यांनी थेट राज्य माहिती आयोग, मुंबई यांच्याकडेही तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार सुनील पटले यांनी १ जून आणि कैलास बनकर यांनी ७ जून रोजी डोंगरला ग्रामपंचायतीच्या जन माहिती अधिकाऱ्याकडे माहितीचा अर्ज केला होता. यामध्ये सन २०२२ ते २०२६ या कालावधीतील १५ व्या वित्त आयोगाचा निधी, खर्चाचा तपशील, नमुना १९, १५, ५ तसेच एम.बी. व एस्टिमेटची मागणी करण्यात आली होती. ग्राम विकास अधिकारी तथा माहिती अधिकारी यांनी बजावलेल्या सूचनेनुसार, सुनील पटले यांनी ७ जुलै रोजी १ हजार ५०० रुपये आणि कैलास बनकर यांनी ८ जुलै रोजी १ हजार ९४० रुपये शुल्क ग्रामपंचायतीत जमा केले होते. मात्र, शुल्क भरून १० ते १२ दिवस उलटल्यानंतरही  माहिती न मिळाल्याने अर्जदारांनी प्रशासकीय स्तरावर दाद मागितली आहे.

डोंगरला ग्रामपंचायतीमध्ये यापूर्वीही माहिती अधिकारावरून वाद झाले आहेत. १५ एप्रिल रोजी संगीता शरणागत यांनी मागितलेली माहिती अपूर्ण स्वरूपात देऊन, पूर्ण माहिती मिळाल्याबाबत स्वाक्षरी घेतल्याचा ठपका माहिती अधिकाऱ्यावर ठेवण्यात आला होता. आता पुन्हा एकदा शुल्क स्वीकारूनही माहिती टाळली जात असल्याने संशय व्यक्त केला जात आहे. सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांनी १२ जून रोजी या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते, परंतु अद्याप तो सादर झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. माहिती दडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

“अर्जदारांनी शुल्क भरल्याची पावती सुरुवातीला सादर केली नव्हती. त्यानंतर त्यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, एका अर्जदाराने ‘उद्या कार्यालयात येतो’ असे सांगितले, तर दुसऱ्या अर्जदाराने सध्या वेळ नसल्याचे सांगितले. दोघेही माहिती घेण्यासाठी कार्यालयात आले नाहीत. त्यामुळे आज संबंधित माहिती टपालाद्वारे पाठविण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.”

  – मंजुषा सहारे, माहिती अधिकारी, डोंगरला

शुल्क भरून १० ते १२ दिवस झाले, तरी माहिती घेऊन जाण्याबाबत कोणतेही पत्र किंवा सूचना मिळाली नाही.

  – सुनील पटले, अर्जदार.

मी शुल्क भरले असून माहिती पोस्टाने मागितली होती. मात्र, अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झाली नाही.

  – कैलास बनकर, अर्जदार