– सेंट विसेंट पलोटी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची विद्यापीठाच्या इंक्युबॅशन सेंटरला भेट
नागपूर :- अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी नवीन स्टार्टअप तसेच नाविन्यपूर्ण संशोधनाची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या केंद्राच्या माध्यमातून जाणून घेतली. नागपूर येथील सेंट विसेंट पलोटी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील इंक्युबॅशन सेंटरला शुक्रवार, दि. १९ सप्टेंबर २०२५ रोजी भेट दिली.
कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली इंक्युबॅशन सेंटर संचालक डॉ. अभय देशमुख यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. इंक्युबॅशन सेंटर येथे आयोजित भेटीदरम्यान विद्यार्थ्यांसाठी नाविन्यपूर्ण आणि उद्योजकता कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून त्याचप्रमाणे नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून स्टार्टअप कशाप्रकारे उभे करता येते याबाबत त्यांनी माहिती दिली. अभियांत्रिकीच्या विस्तीर्ण जगात संशोधन करीत नवनवीन कल्पना प्रत्येक साकार करण्यास मोठी संधी आहे. नाविन्यपूर्ण मॉडेल साकार करीत यातून स्वतः स्वयंरोजगार तसेच इतरांना रोजगार देण्याची क्षमता अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. यावेळी इंक्युबॅशन सेंटरच्या मदतीने विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मॉडेल्सची माहिती देत येथील उद्योगांसाठी कशाप्रकारे सहाय्यभूत ठरले हे देखील त्यांनी यावेळी सांगितले. सेंट विसेंट पलोटी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील या औद्योगिक माहिती भेटीचे समन्वयक म्हणून प्रा. सचिन जनबंधू तसेच शिक्षक प्रा. पुनम महाकाळकर, प्रा. नेहा झाडे, प्रा. विकास सिंग यांनी जबाबदारी पार पाडली. या भेटीदरम्यान बीटेकच्या द्वितीय आणि तृतीय सत्रातील १३० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.




