– गणेशभक्तांच्या सुविधांना प्राधान्य; सुरक्षा, स्वच्छता व वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासनाला निर्देश
कामठी :- गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कामठी येथील महादेव घाट (नदी) परिसरात प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तयारीचा गुरुवारी आढावा घेण्यात आला. विसर्जनासाठी येणाऱ्या गणेशभक्तांची मोठी गर्दी लक्षात घेता कोणतीही गैरसोय अथवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विविध व्यवस्थांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.
महादेव घाट परिसरातील सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, प्रकाशयोजना, वाहतूक नियंत्रण आणि आवश्यक नागरी सुविधा यांचा आढावा घेत प्रशासनाला आवश्यक त्या विशेष सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या. विसर्जनाच्या दिवशी भाविकांची वाढती गर्दी, वाहनांची वर्दळ आणि नदीकाठावरील सुरक्षितता लक्षात घेऊन संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत, सुरक्षिततेत आणि सुव्यवस्थित पद्धतीने पार पडावा, यासाठी पोलीस व नगर परिषद प्रशासनाने आवश्यक नियोजन पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अंकुश खेडेकर, जुनी कामठी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय दिघे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे, नगरसेवक दिलीप बंडेबुचे, माजी नगरसेवक कपिल गायधने, युवा मोर्चा अध्यक्ष विजय कोंडुलवार, सुनील पमनानी यांच्यासह नगर परिषद अधिकारी उपस्थित होते.





