– मौजा-नारी येथे मनपा उभारणार 392 सदनिका : उपमहापौर लिला हाथीबेड यांच्यासह मनपा आयुक्तांनी केली
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजने अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपाच्या सफाई कामगारांसाठी मौजा नारी भागात उभारण्यात येणाऱ्या घरकुल प्रकल्पाची (ता. 23) उपमहापौर लिला हाथीबेड आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी पाहणी केली. प्रकल्पाचे कार्य लवकरात लवकर पूर्ण करावे असे निर्देश उपमहापौर लिला हाथीबेड यांनी दिले.
यावेळी झोन सभापती आसिफ शेख, नगरसेवक दिनेश यादव, माजी नगरसेवक मनोज सांगोळे, उपायुक्त गणेश राठोड, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, कार्यकारी अभियंता सुनील उईके, निलेश बोबडे, वृक्ष संवर्धक अमोल चौरपगार, झोनल स्वच्छता अधिकारी भोला खोब्रागडे, एसडीपीएलचे गौरव अग्रवाल व राहुल अग्रवाल यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

महापौर निता ठाकरे, उपमहापौर लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्या मार्गदर्शनात व आयुक्त डॉ. विपीन यांच्या देखरेखीत मनपाच्या सफाई कामगारांसाठी मौजा नारी येथे 2 बीएचके घरकुल योजना उभारण्यात येणार आहे. या 2 बीएचके घरकुलाचे चटई क्षेत्र 500 चौरस फूट राहणार आहे. येथे एकूण 392 सदनिकांचे बांधकाम करण्यात येणार असून 42,103.92 चौ.मी. जागेवर ‘जी प्लस 7’ (G+7) अशा 14 इमारती उभारण्यात येणार आहेत.
याशिवाय, नागरिकांना या आवास योजनेपर्यंत जाण्यासाठी 18 मीटर आणि 12 मीटर रुंदीच्या रस्त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. यावेळी उपमहापौर आणि मनपा आयुक्त यांनी जागेची प्रत्यक्ष पाहणी करीत श्रम साफल्य आवास योजनेची माहिती घेतली. एसआरए कॉलनी विटाभट्टी, उपलवाडी येथून ते नारीपर्यंत प्रस्तावित डीपी मार्ग तयार करताना रस्त्यालगत नळाची पाईपलाईन टाकण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी दिले. तसेच या जागेच्या पर्यावरणाशी संबंधित काही प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्यास, त्याची माहिती सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.
त्याचबरोबर, एसआरए कॉलनीमध्ये राहत असलेल्या नागरिकांसाठी आणि सफाई कामगारांसाठी तयार करण्यात येत असलेल्या कॉलनीसाठी ‘एसटीपी’ (सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) तयार करावा, आवास योजनेतील जागा समपातळीत करावी, झुडपे व गवत छाटावे आणि आवास योजना राबवताना जास्तीत जास्त झाडे वाचवावीत, असेही निर्देश त्यांनी दिले. डीपी रस्ता तयार करण्यासाठी येणाऱ्या अडचणीबाबत एनआयटी व इतर विभागांसोबत बैठक आयोजित करण्याचे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच एसआरए कॉलनीतील सेप्टिक टँकची साफसफाई नियमित करण्याचे निर्देशही यावेळी मनपा आयुक्तांनी दिले.




