इन्स्टाग्रामवरील ओळख पडली महागात; प्रसिद्ध टीव्ही अभिनेता आशिष कपूरवर बलात्काराचा आरोप, पुण्यातून अटक

0
144

 

पुणे ४ : प्रसिद्ध टीव्ही आणि चित्रपट अभिनेता आशिष कपूर याला एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या मदतीने पुण्यातून अटक करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या एका महिलेने त्याच्यावर हे गंभीर आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दिल्लीमध्ये एका हाऊस पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पीडितेने आरोप केला आहे की, याच पार्टीमध्ये वॉशरूममध्ये आशिष कपूरने तिच्यावर बलात्कार केला. ही घटना घडल्यानंतर पीडितेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आशिष कपूरला पुण्यातून अटक केली आहे.

पीडितेने सुरुवातीला आशिषसह त्याचा मित्र, मित्राची पत्नी आणि इतर दोघांवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, नंतर तिने केवळ आशिषनेच अत्याचार केल्याचे सांगितले. या घटनेचा व्हिडिओ काढल्याचा दावाही तिने केला, पण पोलिसांना कोणताही व्हिडिओ मिळालेला नाही. याशिवाय, वॉशरूममधून बाहेर आल्यानंतर आशिषच्या मित्राच्या पत्नीने मारहाण केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. मात्र, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिषच्या मित्राच्या पत्नीनेच पोलिसांना कॉल करून संपर्क साधला होता.

आशिष कपूर हा ‘सात फेरे’ आणि ‘देखा एक ख्वाब’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचला आहे. त्याने ‘इंकार’, ‘कुर्बान’, ‘टेबल नंबर २१’ यांसारख्या काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. या अटकेमुळे मनोरंजनसृष्टीत एकच खळबळ उडाली आहे. पुढील तपास दिल्ली पोलीस करत आहेत.