मुंबई ४ : केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. जीएसटी परिषदेच्या 56 व्या बैठकीत अनेक दैनंदिन गरजेच्या वस्तूंवरील वस्तू आणि सेवा कर (GST) काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता दूध, पनीर, चपाती, आरोग्य आणि जीवन विमा यासह अनेक वस्तू करमुक्त झाल्या आहेत, ज्यामुळे त्यांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत करप्रणाली अधिक सोपी आणि पारदर्शक बनवण्यावर भर देण्यात आला. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फायदा होईल.
या आवश्यक वस्तू आता जीएसटीमुक्त
सरकारने खालील वस्तू आणि सेवांवरील 5% जीएसटी रद्द केला आहे, ज्यामुळे त्या आता पूर्णपणे करमुक्त झाल्या आहेत:
UHT दूध (अल्ट्रा-हाय टेम्परेचर मिल्क)
छेना आणि पनीर
रोटी/ चपाती
वैयक्तिक आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसी
नकाशे, आलेख आणि चार्ट्स
जीवन वाचवणारी औषधे
स्टेशनरी साहित्य: नोटबुक, एक्सरसाईज बुक, पेन्सिल, शार्पनर आणि खोडरबर
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल
जीएसटी परिषदेने करप्रणालीमध्ये मोठे बदल केले आहेत. आतापर्यंत असलेले 12% आणि 28% चे टॅक्स स्लॅब पूर्णपणे रद्द करण्यात आले आहेत. यापुढे बहुतांश वस्तू आणि सेवा फक्त 5% आणि 18% या दोन स्लॅबमध्येच असतील. हा निर्णय मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.
या बदलांमुळे केवळ ग्राहकांनाच नाही, तर छोटे आणि मध्यम व्यापाऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. जीएसटी नियम सोपे झाल्याने नोंदणी आणि रिटर्न भरण्याची प्रक्रिया सुलभ झाली आहे, ज्यामुळे देशभरातील व्यापाऱ्यांसाठी व्यापार करणे अधिक सोयीस्कर होईल. सरकारच्या या निर्णयामुळे महागाई कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.




