खापा, वार्ताहर :- तालुक्यातील सर्रा गावातील पुरातन मंदिरात विविध देवी-देवतांच्या मूर्तीची स्थापना करण्याचा सोहळा नुकताच संपन्न झाला.
येथील बखाई फॉर्म हाऊसला लागूनच पुरातन देवी मंदीर आहे. येथे विधीवत पूजाअर्चना करून गणपती, शिवलिंग, दुर्गा देवी, कासव इ. मूर्तीची स्थापना करण्यात आली. ढोल ताशाचा गजर, पालखी सोहळ्याने सर्रा गाव भक्तीसागरात डुबल्याचे अनुभवले. स्थानिक आणि परिसरातील बिचवा, कोरमेटा, नागलवाडी येथील भजन मंडळे पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. पालखीचे गावात विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले. यादरम्यान खाद्य व्यंजने, लिंबूपाणी, थंड पाणी भक्तांना वितरित करण्यात आले.
जितेश बखाई यांनी मुर्ती स्थापनेच्या कार्यात प्रामुख्याने पूढाकार घेतला. उपस्थित सर्व भक्तांना भोजनदान करण्यात आले. भाविकांनी मनसोक्त महाप्रसादाचा आस्वाद घेतला. नयनरम्य परिसरातील पालखी सोहळ्यात शेकडो भक्तांनी उपस्थित राहून मंदिरात पूजा अर्चना करून आशीर्वाद घेतला आणि जागतिक स्तरावर युद्धजन्य परिस्थित जगात शांतता प्राप्त व्हावी यासाठी विशेष प्रार्थना केली.



