– ५.०५ लाखांच्या ७ दुचाकी जप्त
– तीन आरोपी अटकेत, एका विधीसंघर्षित बालकाचा समावेश
पंकज परशुरामकर, प्रतिनिधी नवेगाव बांध :- गोंदिया जिल्ह्यात बुलेटसह दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय वाहनचोर टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन रॉयल एनफिल्ड बुलेटसह एकूण सात चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत ५ लाख ५ हजार रुपये आहे. या प्रकरणी मध्य प्रदेशातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एका विधीसंघर्षित बालकाचाही गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जुलैच्या रात्री दासगाव येथील मनोज दामोदर कटकवर यांच्या घरासमोर उभी असलेली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड बुलेट चोरीला गेली होती. याप्रकरणी रावणवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच रात्री बरबसपुरा येथील जयेंद्र भोजराज नागपुरे यांच्या घराच्या पोर्चमधून पिवळसर-तपकिरी रंगाची रॉयल एनफिल्ड बुलेट चोरीला गेल्याची तक्रार गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती.
या दोन्ही गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या निर्देशानुसार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले.
गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील काही युवक गोंदिया जिल्ह्यात वाहनचोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून निखील सुंदरलाल राहांगडाले (वय २०, रा. शिवणघाट, ता. खैरलांजी, जि. बालाघाट) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत त्याने रोहित नरेंद्र माने, वरुण जागेश खुळसाम, नयन भानुप्रसाद ठाकरे आणि एका विधीसंघर्षित बालकाच्या मदतीने गोंदिया जिल्ह्यातील दासगाव, बरबसपुरा, भोसा (आमगाव), बोरगाव (कवलेवाडा), एकोडी तसेच इतर ठिकाणांहून एकूण सात मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी रोहित नरेंद्र माने, नयन भानुप्रसाद ठाकरे तसेच विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. नयन ठाकरे याच्या ताब्यातून चोरीच्या सातही मोटारसायकली जप्त करण्यात आल्या.
जप्त केलेल्या वाहनांमध्ये
३ रॉयल एनफिल्ड बुलेट
३ होंडा शाईन
१ हिरो स्प्लेंडर प्लस
अशा एकूण ७ दुचाकी, किंमत ५,०५,००० रुपये यांचा समावेश आहे.
या प्रकरणी रोहित नरेंद्र माने (२१), निखील सुंदरलाल राहांगडाले (२०) आणि नयन भानुप्रसाद ठाकरे (१९) या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुद्देमालासह गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. आरोपींचा साथीदार वरुण जागेश खुळसाम याचा शोध सुरू असून विधीसंघर्षित बालकाबाबत नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक जंगमवार, अमरदीप खाडे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.








