spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

ज्ञानासाठी गुंतवणूक हाच आपला विकासमंत्र – आ. अभिजित वंजारी

– २५० वाचनालये आणि १३०० शाळा-महाविद्यालयांना डिजिटल साधनांचा लाभ; ब्रह्मपुरीत काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) :- शिक्षण आणि ज्ञानातील गुंतवणूक हीच समाजाच्या प्रगतीची खरी पायाभरणी आहे. पदवीधर मतदारसंघाचा आमदार म्हणून मिळालेल्या निधीतून उद्याचे विद्यार्थी घडविण्याला आपण प्राधान्य दिले. त्यामुळे आमदार म्हणून मिळणारा निधी हा ज्ञानासाठीची गुंतवणूक आहे, असे प्रतिपादन नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे विद्यमान आमदार तथा काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी केले.

ब्रह्मपुरी येथील आरमोरी मार्गावरील झाडे मीटिंग हॉलमध्ये आयोजित काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहाही जिल्ह्यांमध्ये विकासकामांना गती मिळावी, यासाठी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा केल्याचे वंजारी यांनी सांगितले.

समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवणे गरजेचे आहे. याच भावनेतून आपल्या कार्यकाळात २५० सार्वजनिक वाचनालयांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आधुनिक पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. तसेच सुमारे १३०० शाळा व महाविद्यालयांना संगणक संच देऊन डिजिटल शिक्षणाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला, असे वंजारी यांनी सांगितले.

आमदारकीच्या मागील सहा वर्षांत केलेली ही ज्ञानोपयोगी कामे मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. पदवीधर मतदारसंघातील प्रत्येक जिल्ह्यातील पदवीधरांपर्यंत विकासकामांची माहिती पोहोचवून त्यांचा विश्वास संपादन करा. ज्ञान, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी अधिक सक्षम करण्यासाठी आपली भूमिका स्पष्टपणे मतदारांसमोर मांडा, असेही त्यांनी सांगितले.

काँग्रेसला पुन्हा संधी देण्याचा विश्वास

बैठकीपूर्वी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार अभिजित वंजारी यांचे स्वागत करण्यात आले. मागील निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसच्या उमेदवाराला कौल देत वंजारी यांना संधी दिली. या संधीचे त्यांनी आपल्या कामातून सोने केले असून, ज्ञानाच्या या यज्ञात यंदाही प्रत्येक मतदार आपली मतरूपी समिधा टाकेल, असा विश्वास काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

आमदार वंजारी यांनी सहाही जिल्ह्यांमध्ये शिक्षण आणि ज्ञानाला प्राधान्य देत केलेली कामे पदवीधर मतदारांच्या हिताची आहेत. ही कामे मतदारांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्ते जीवाचे रान करतील, असा विश्वास ब्रह्मपुरी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

यावेळी ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष बाळूभाऊ राऊत, माजी प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, प्राचार्य डॉ. रमेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, प्राचार्य डॉ. एन. एस. कोलोडे, प्रदेश सचिव डॉ. ज्ञानेश्वर कायरकर, माजी सभापती नेताजी मेश्राम, खो.रि.पा.चे राज्य सरचिटणीस बागडे, नगराध्यक्ष योगेश मिसार, नगरपरिषद उपाध्यक्ष नितीन उराडे, महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष मंगला लोनबले, महिला काँग्रेस शहराध्यक्ष सौ. योगिता आमले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles