– नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या पुढाकाराने सिमेंटीकरणाच्या कामाला गती; नागरिकांकडून मनःपूर्वक आभार
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीतील कामठी-कळमना मार्गावरील सिंधी कॉलोनी परिसरातील नगर परिषद शाळेसमोर नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने निर्माण झालेल्या समस्येची नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने संबंधित ठिकाणी डागडुजी करून सिमेंटीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, कामाला गती देण्यात आली आहे.
नगर परिषद शाळेसमोरील जागेवर सातत्याने कचरा टाकला जात असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधी व अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या समस्येची कायमस्वरूपी सोडवणूक करण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.
नागरी हिताला प्राधान्य देत नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत संबंधित ठिकाणी सिमेंटीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी कचरा टाकण्यास आळा बसण्यास मदत होणार असून परिसर स्वच्छ व सुव्यवस्थित राहण्यास हातभार लागणार आहे.तरीसुद्धा सवयाधीन झालेल्या काही बेजवाबदार नागरिकांकडून या ठिकाणी कचरा टाकल्यास संबंधित नागरिकांची चित्रफिती सीसीटीव्ही क्यामेऱ्यात कैद करून दंडात्मक कारवाही करण्यात येणार आहे.
दरम्यान, नागरिकांच्या समस्येची तत्परतेने दखल घेत कायमस्वरूपी उपाययोजना केल्याबद्दल परिसरातील जागरूक नागरिकांनी नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्या कार्यतत्पर भूमिकेचे कौतुक केले असून, “नागरी समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांचे मनःपूर्वक आभार,” अशी भावना जागरूक नागरिकांनी व्यक्त केली आहे.








