– पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार नगराध्यक्ष अजय अग्रवाल यांच्याकडून जुनी कामठी जॅकवेलची पाहणी; जलस्तर व पाणीपुरवठ्याचा घेतला आढावा
कामठी :- आगामी उन्हाळ्यात कामठी शहरात संभाव्य जलटंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी नगर परिषद प्रशासनाने आतापासूनच उपाययोजनांना सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार नगर परिषद अध्यक्ष अजय रुपनारायण अग्रवाल यांनी गुरुवारी जुनी कामठी येथील कन्हान नदीवरील जॅकवेलची पाहणी करून पाणीपुरवठ्याच्या स्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला.
कन्हान नदीतून जलशुद्धीकरण केंद्राकडे होणाऱ्या पाणीपुरवठ्यासाठी जॅकवेल परिसरातील सद्य जलस्तर, पाण्याची उपलब्धता तसेच आगामी उन्हाळ्यात जलस्तर कमी झाल्यास निर्माण होणाऱ्या संभाव्य अडचणींबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. शहरातील नागरिकांना भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागू नये, यासाठी जलस्तर कायम राखण्यासोबतच पर्यायी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे नियोजन करण्याचे निर्देश अग्रवाल यांनी दिले.
उन्हाळ्यापूर्वीच पाणीपुरवठा यंत्रणेची तांत्रिक पाहणी, आवश्यक दुरुस्ती आणि उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करण्यावर भर देण्यात यावा. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करून नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, अशी भूमिका यावेळी नगराध्यक्ष अग्रवाल यांनी व्यक्त केली.
प्रशासनिक यंत्रणेला सतर्कतेचे निर्देश
कामठी शहराची वाढती लोकसंख्या आणि उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, पाणीपुरवठ्याच्या मुख्य स्रोतांची आतापासूनच पाहणी करून भविष्यातील गरजेनुसार उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. त्यामुळे जॅकवेलच्या पाहणीला आगामी पाणीपुरवठ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने महत्त्व प्राप्त झाले आहे.
यावेळी नगर परिषद मुख्याधिकारी विनोद जाधव, भाजपा अध्यक्ष मंगेश यादव, पाणीपुरवठा सभापती दिलीप बांडेबुचे, बांधकाम अभियंता अरविंद गोटवाल, पाणीपुरवठा अभियंता वीरेंद्र ढोके, विद्युत विभाग अभियंता सतीश उड़कुडे, माजी नगरसेवक कपिल गायधने, युवा मोर्चा अध्यक्ष विजय कोंडुलवार, आशु अवस्थी, अथर्व पिंगळे, शानू ग्रावकर, येतेश्याम अंसारी, कृष्णा खंडेलवाल यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.








