spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

लोकायुक्त कार्यालयाने स्वायत्तता आणि जनतेचा विश्वास कायम राखणे महत्त्वाचे – न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे

· न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांचा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

मुंबई :- लोकायुक्त ही वैधानिक आणि स्वायत्त संस्था असून तिची स्वायत्तता कायम राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या कार्यकाळात अनेक उच्चपदस्थ व्यक्ती, वरिष्ठ अधिकारी, मंत्रालये व महामंडळांशी संबंधित प्रकरणे हाताळली; मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव आपल्यावर आला नाही. सर्व पक्षकारांचा संस्थेच्या निष्पक्षतेवर विश्वास होता, ही समाधानाची बाब आहे, असे मत लोकआयुक्तचे मावळते अध्यक्ष न्यायमूर्ती कानडे यांनी व्यक्त केले.

अध्यक्ष लोकआयुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांचा कार्यकाल 18 ऑगस्ट, 2026 रोजी संपुष्टात आला. या औचित्याने त्यांचा निरोप समारंभ सन्माननीय लोकआयुक्त चे सदस्य रश्मी शुक्ला, सदस्य ओ. पी.गुप्ता, सदस्य सुरेंद्र तावडे, सदस्य सुवर्णा केवले यांच्या उपस्थितीत मंत्रालयात संपन्न झाला. यावेळी लोकायुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्राचे लोकायुक्त म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांना निरोप देण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना त्यांनी कार्यकाळातील सहकार्याबद्दल राज्यपाल, महाराष्ट्र शासन, उच्च न्यायालय व न्यायव्यवस्थेतील मान्यवरांसह अधिकारी, कर्मचारी, तक्रारदार, प्रतिवादी आणि वकिलांचे मनःपूर्वक आभार मानले. पाच वर्षांचा कार्यकाळ हा केवळ तारीख आणि महिन्यांनी मोजता येत नसून, जनतेची निष्पक्ष व प्रामाणिकपणे सेवा करण्यासाठी मिळालेल्या संधींच्या रूपाने तो लक्षात राहील, असे त्यांनी सांगितले.

न्यायाची प्रक्रिया स्वच्छ, पारदर्शक आणि सर्वांसाठी निष्पक्ष असावी, या भूमिकेतून कायद्याने दिलेल्या अधिकारांचा वापर करून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली. लोकायुक्त कार्यालयाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठीही सातत्याने प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. लोकायुक्त कार्यालयाकडे इतर न्यायालयांच्या तुलनेत प्रकरणांची संख्या कमी असली, तरी प्रत्येक प्रकरणातून एका व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे, असे न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी स्पष्ट केले.

यावेळी न्यायमूर्ती तावडे, सुवर्णा केवळे, ओ. पी. गुप्ता आणि रश्मी शुक्ला यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख करून त्यांनी सहकाऱ्यांच्या योगदानाचे कौतुक केले. पुढील काळात लोकायुक्तला सक्षम नेतृत्व मिळेल आणि आगामी पाच वर्षे संस्थेसाठी सुवर्णकाळ ठरतील, असा विश्वासही न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी व्यक्त केला.

लोकआयुक्त सदस्य न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे हे संवेदनशील, पुरोगामी आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या न्यायनिवाड्यांमध्ये कायद्याबरोबरच मानवी संवेदना, सामाजिक भान आणि संस्थांचा सन्मान जपण्याची भूमिका दिसून येते.

लोकआयुक्त सदस्य रश्मी शुक्ला यांनी यावेळी लोकआयुक्त अध्यक्ष न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, “हा शेवट नसून आयुष्याची नवी सुरुवात आहे. वर्तमानात जगत प्रत्येक दिवसाचा आनंद घ्या. आयुष्य दीर्घ, निरोगी, रंजक आणि साहसांनी भरलेले असावे. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे,” असे सांगत त्यांनी निरोगी व आनंदी जीवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

लोकआयुक्त सदस्य ओ. पी. गुप्ता यांनी यावेळी अध्यक्ष लोकआयुक्त न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, न्यायमूर्ती व्ही. एम. कानडे यांनी आपल्या कार्यकाळात केलेल्या कामातून आणि दिलेल्या न्याय व मदतीतून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला असून, त्यांच्या अनुभवातून पुढील पिढीला मार्गदर्शन मिळणे महत्वाचे आहे.

सदस्य सुवर्णा केवले यांनी आपल्या मनोगतातुन न्यायमूर्ती व्हि. एम. कानडे यांचा साध्या, लोकाभिमुख आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्वाचा गौरव असून त्यांचे मार्गदर्शन आणि त्यांचे सोप्या भाषेतील लोकाभिमुख न्यायनिर्णय पुढील पिढीतील न्यायाधीशांसाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद करत त्यांनी दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी लोकायुक्त कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी मनोगत व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.