spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इटगाव ग्रामपंचायतीचा गौरव: देशातील सर्वोत्तम ‘बालस्नेही पंचायत’ म्हणून पटकावला प्रथम क्रमांक

– १ कोटी रुपयांची रक्कम आणि मानचिन्ह प्रदान; सरपंच कविता चौधरी व प्रशासकीय चमूच्या मेहनतीला यश

इनसाइडर न्युज टुडे, प्रतिनिधी भंडारा :- भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाद्वारे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार’ भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीने पटकावला आहे. देशातील विविध नऊ श्रेणींमध्ये (थीम्स) ग्रामपंचायतींची निवड केली जाते, ज्यामध्ये इटगाव पुनर्वसनने ‘बालस्नेही पंचायत’ या विषयात संपूर्ण देशात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यासह महाराष्ट्राचा गौरव राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित केला आहे.

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या अभिनव व प्रभावी उपक्रमांची दखल घेऊन हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कारामध्ये पंचायत राज मंत्रालयाकडून एक कोटी रुपयांची रक्कम व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येते.

तसेच पंचायत समिती भंडारा येथील अधिकारी व कर्मचारी यांची टीम, ग्रामपंचायतीचे सरपंच कविता चौधरी, ग्रामपंचायत अधिकारी पठाण, तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांनी एकत्रितपणे काम करत बालस्नेही वातावरण निर्मितीसाठी विविध उपक्रम राबविले.

बालकांच्या आरोग्य, शिक्षण, पोषण, संरक्षण व सहभाग या सर्व घटकांवर लक्ष केंद्रित करून ग्रामपंचायतीने आदर्श कार्य केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे भंडारा जिल्ह्याच्या ग्रामीण विकास कार्याला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून इतर ग्रामपंचायतींसाठी इटगाव पुनर्वसन हे प्रेरणास्थान ठरत आहे. जिल्ह्यातील सर्व स्तरांवरून या कामगिरीचे कौतुक होत असून संबंधित सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Popular Articles