spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

नवेगाव बांध तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी जगदीश पवार

पंकज परशुरामकर, प्रतिनिधी इनसाइडर न्युज टुडे 

नवेगाव बांध :- ग्रामपंचायत नवेगाव बांधची ग्रामसभा गुरुवार, दि. २० ऑगस्ट २०२६ रोजी पार पडली. या ग्रामसभेत तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदासाठी जनतेमधून जगदीश झामसिंग पवार, रेवचंद शहारे व  खेमचंद रंगारी अशी तीन नावे समोर आली. यावेळी ग्रामस्थांनी जगदीश पवार यांच्या नावाला सर्वाधिक पसंती व दुजोरा दिल्याने त्यांची नवेगाव बांध तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून जगदीश पवार यांचा प्रदीर्घ सामाजिक व राजकीय अनुभव असून, गावातील विविध सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची भूमिका नेहमीच सक्रिय राहिली आहे. विशेष म्हणजे बालाजी शंकरपट समिती, नवेगाव बांध यांच्या सहकार्याने तब्बल पन्नास वर्षांपासून बंद पडलेला पारंपरिक शंकरपट पुन्हा सुरू करण्यासाठी जगदीश पवार यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि सामाजिक एकोपा जपण्यासाठी त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांची गावात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर गावातील छोटे-मोठे वाद संवादातून मिटविणे, सामाजिक सलोखा वाढविणे आणि गावकऱ्यांमध्ये एकोपा निर्माण करण्यासाठी ते पुढाकार घेतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यांच्या दूरदृष्टीचा, सामाजिक अनुभवाचा आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याच्या वृत्तीचा उपयोग नवेगाव बांधच्या सामाजिक विकासासाठी होईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत तंटामुक्त, एकजुटीचे आणि विकासाभिमुख नवेगाव बांध घडविण्यासाठी जगदीश पवार यांचे नेतृत्व निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, अशी भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.