हंसराज, प्रतिनिधी भंडारा जवाहरनगर :- जनावरांना निर्दयतेने वागणूक देऊन त्यांची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध जवाहरनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका बोलेरो पिकअपसह चार गोवंश जातीची जनावरे असा एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पोलीस उपनिरीक्षक सोनपितरे हे आपल्या ताफ्यासह पेट्रोलिंगवर असताना त्यांना गोपनीय बातमी मिळाली की, नॅशनल हायवे ६३ वरील बालाजी सिटी ले-आउटसमोर एका वाहनातून जनावरांची अवैध वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मौजा पेट्रोल पंप ठाणा येथे सापळा रचून महींद्रा बोलेरो पिकअप (क्र. एम.एच. ४० बी. जी. १८४५) अडवले.
या वाहनाची झडती घेतली असता, त्यात चार बैल अत्यंत निर्दयतेने, दाटीवाटीने आणि आखूड दोरीने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. जनावरांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. ही जनावरे कत्तलीच्या उद्देशाने नेली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी वाहनचालक अभिषेक गौरीशंकर सपाटे (वय ३०, रा. रोहा, ता. मोहाडी, जि. भंडारा) आणि वाहन मालक नूर कुरेशी (रा. कामठी, नागपूर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पांढऱ्या रंगाचे महींद्रा बोलेरो पिकअप (किंमत ५,००,०००/- रु.), एक काळ्या रंगाचा जर्सी बैल (किंमत २०,०००/- रु.), दोन पांढऱ्या रंगाचे बैल (किंमत २०,०००/- रु.), एक लालसर रंगाचा बैल (किंमत १०,०००/- रु.) एकूण मुद्देमाल: ५,५०,०००/- रुपये.
सदर प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात अप.क्र. ३६/२०२६ कलम ११(१)(घ) ( ड) ( च) (ज) (झ) नुसार प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६० सहकलम महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम २०१५ कलम ९अ,११ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सोनपितरे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास जवाहरनगर पोलीस करीत आहे.








