spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कत्तलीसाठी होणारी २२ गोवंशांची अवैध वाहतूक जवाहरनगर पोलिसांकडून उघडकीस; दोन वाहनांसह १४ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

हंसराज,भंडारा :- कत्तलीच्या उद्देशाने गोवंशांना अत्यंत क्रूरपणे कोंबून बेकायदेशीररीत्या वाहतूक करणाऱ्या एका टोळीचा जवाहरनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मौजा राजेदेहगांव येथे धाड टाकून पोलिसांनी २२ गोवंशांची सुटका करत दोन बोलेरो पिकअप वाहनांसह एकूण १४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरोधात विविध प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा व त्यांच्या पथकाने मौजा राजेदेहगांव (ता. जि. भंडारा) येथे अचानक छापा टाकला. या कारवाईदरम्यान आरोपी क्रमांक ४ याच्या घराच्या अंगणातून गोवंशांची अवैधपणे वाहनांमध्ये कोंबून वाहतूक करण्याची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत घटनास्थळावरून आशिष प्रकाश मेश्राम (वय २३ वर्षे, रा. भिवसनटोला, ता. साकोली, जि. भंडारा), नितिन योगराज मेश्राम (वय २३ वर्षे, रा. हेटी-गिरोला, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया), उमेश मेश्राम (वय ४८ वर्षे, रा. भिवसनटोला, ता. साकोली, जि. भंडारा) आणि निखील ईश्वर थोटे (रा. राजेदेहगांव, ता. जि. भंडारा) या चार जणांविरोधात कारवाईचा बडगा उचलला. आरोपी ही जनावरे कत्तलीसाठी नेण्याच्या तयारीत होते.

या कारवाईत पोलिसांनी अंगणातून विविध रंगांची एकूण २२ गोवंश जनावरे ताब्यात घेतली. यामध्ये १ लाख ४० हजार रुपये किमतीची १४ लाल रंगाची जनावरे, ३० हजार रुपये किमतीची ३ काळ्या रंगाची मोठी जनावरे, १० हजार रुपये किमतीची २ काळ्या रंगाची लहान वासरे आणि ३० हजार रुपये किमतीची ३ पांढऱ्या रंगाची जनावरे अशा एकूण २ लाख १० हजार रुपयांच्या पशुधनाचा समावेश आहे. याशिवाय जनावरांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी दोन पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहने—क्रमांक MH 35 AJ 3522 (किंमत ₹६,००,०००/-) आणि क्रमांक MH 36 AA 4151 (किंमत ₹६,००,०००/-)—असा एकूण १४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ४२७ अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम ५, ५(अ)(ब), सहकलम प्राणी क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम ११ (१) (घ), (ड), (च), (छ) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची यशस्वी कारवाई भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे व पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दुधकावरा, पोलीस हवालदार ठवरे व जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने पार पाडली असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार इरशाद खान करीत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.