कामठी :- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कामठी तालुक्यातील वरंभा ग्रामपंचायत येथे आयोजित संयुक्त शेतकरी मेळाव्याला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक संरक्षण आणि विविध शासकीय योजनांची माहिती या मेळाव्यात शेतकऱ्यांना देण्यात आली.
मेळाव्यात सोयाबीन, कापूस व धान पिकांवरील एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याचे तंत्र, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन, रेशीम उद्योगातील संधी, ठिबक व स्प्रिंकलर सिंचनाचे महत्त्व, पीव्हीसी पाईप व मोटार अनुदान, ट्रायकोकार्ड व कामगंध सापळ्यांचा वापर, धान पिकातील श्री व पट्टा पद्धत, निंबोळी अर्क व ट्रायकोडर्माचा वापर तसेच प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
मेळाव्याला कीटकशास्त्रज्ञ डॉ. हरीश सवई, तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे, हवामानतज्ज्ञ डॉ. आशिष चौधरी, पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. डी. टी. उंदतरवाड, उपकृषी अधिकारी प्रदीप कडभाने, उपकृषी अधिकारी सुनिता राठोड तसेच सहायक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर मल्लेवार, तपेश समरीत, विशाल कव्हर आणि अविनाश शिंगटे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास सरपंच ज्योती भोयर, उपसरपंच वैभव काकडे, ग्रामपंचायत पदाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांच्या विविध कृषी विषयक प्रश्नांचे समाधान करण्यात आले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी करत उत्पन्न वाढविण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले.




