spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

प्रख्यात रामगडावर काकडा आरतीला प्रारंभ

– पहाटे साडेचार वाजतापासुन लावतात भक्तगण हजेरी

सचिन चौरसिया प्रतिनिधी,रामटेक :- प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तथा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या प्रख्यात रामनगरीतील श्रीराम गडावर नुकत्याच (दि.७) ऑक्टोबर पासून काकडा आरतीला पारंपारिक पद्धतीने प्रारंभ झालेला आहे. आरती पहाटे ५ वाजता होत असते. पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने भाविकांनी येथे हजेरी लावली होती.संपूर्ण कार्तिक महिन्यात दररोज पहाटे ५ वाजता आरती होणार असून त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी समारोप केला जाणार आहे. काकड आरतीला लहानांपासून तर वृद्धांपर्यंत भाविक हजेरी लावतात हे येथे विशेष.

भोसला देवस्थान गडमंदिरचे रिसिव्हर तथा उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अधिकारी चंद्रशेखर बावनकर हे आरतीच्या आयोजनाची व्यवस्था पहात असतात. मंदिरात पहाटे साडेचार वाजता भजनानंतर नेमके पाच वाजता आरती केली जाते. यामध्ये श्रीराम मंदिराचे मुख्य पुजारी मोहन पांडे व मंगेश पांडे व लक्ष्मण मंदिराचे पुजारी धनंजय पांडे, संजय पांडे, अविनाश पांडे आणि सुनील पांडे यांचा सहभाग राहतो. काकडा आरतीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण उत्साहाने सहभागी होत असतात. दररोज पहाटे विठ्ठल मंदिरातून काकड आरती भक्त परिवारची पहाटे चार वाजता दिंडी निघत असते. आरतीनंतर भाविकांसाठी विविध भक्तगणांकडून प्रसादाची व्यवस्था केली जाते. ऐतिहासिक दृष्टीने हे मंदिर विशेष मानले जाते. चौथ्या शतकात वाकाटक राणी प्रभावती यांनी रामपादुका पूजल्या, तर १३ व्या शतकात यादव राजांनी मंदिर बांधले. इ.स. १७५३ मध्ये प्रथम रघुजी भोसले यांनी राम-सीतेच्या मूर्तींची स्थापना करून मंदिराची स्थायी व्यवस्था केली. मनसरचे ७२ वर्षीय वृद्ध धनराज काठोके हे दरवर्षी कार्तिक महिनाभर पहाटे तीन वाजता उठून आरतीसाठी येतात.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.