– कामठीच्या निवडणूक निकालावर पुन्हा प्रश्नचिन्ह
संदीप कांबळे, कामठी :- मागील विधानसभा निवडणुकीत कामठी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमय वातावरण असल्याची चर्चा आणि काँग्रेसचे उमेदवार सुरेश भोयर यांच्या विजयाचा व्यक्त होत असलेला ठाम विश्वास प्रत्यक्ष निकालानंतर धुळीस मिळाला. भाजपचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ४० हजार ९४६ मतांच्या फरकाने विजय मिळवत बाजी मारली. आता विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत तब्बल १ लाख ३८ हजार ९०४ मतदारांची नावे प्रारूप मतदार यादीत नसल्याचे समोर आल्याने त्या निकालाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.
मागील निवडणुकीत भाजप चे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांना १ लाख ७४ हजार ९७९, तर कांग्रेस चे उमेदवार सुरेश भोयर यांना १ लाख ३४ हजार ०३३ मते मिळाली. दोन्ही उमेदवारांमधील मतांची तफावत ४० हजार ९४६ इतकी होती. याउलट, विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत प्रारूप मतदार यादीत नसलेल्या मतदारांची संख्या १ लाख ३८ हजार ९०४ आहे. म्हणजेच ही संख्या मागील विजयाच्या फरकापेक्षा तब्बल ९७ हजार ९५८ने अधिक आहे.
मागील निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी बोगस मतदारांच्या मुद्द्याचा उल्लेख करत कामठी विधानसभा मतदारसंघाचा संदर्भ दिल्याचा दावा करण्यात आला होता. त्या वेळी या उल्लेखावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. आता मतदार यादी पुनरीक्षणातून समोर आलेली १ लाख ३८ हजार ९०४ मतदारांची वगळणी या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या त्या तत्कालीन उल्लेखाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी कामठी विधानसभा मतदारसंघात ५ लाख २० हजार ३२९ मतदार होते. त्यापैकी १ लाख ३८ हजार ९०४ म्हणजेच २६.७० टक्के मतदारांची नावे विशेष सखोल पुनरीक्षणानंतरच्या प्रारूप यादीत नसल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. मागील निवडणुकीतील विजयाच्या फरकाच्या तिपटीपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे मतदारसंख्येतील हा बदल केवळ प्रशासकीय आकडेवारी न राहता आगामी निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.
कामठीच्या मागील निवडणुकीत विजयाचा फरक ४० हजार ९४६ मतांचा होता. त्याच्या तुलनेत प्रारूप मतदार यादीत नसलेल्या मतदारांची संख्या १ लाख ३८ हजार ९०४ आहे. दोन्ही आकडेवारीत तब्बल ९७ हजार ९५८ मतांची तफावत आहे
मागील निवडणुकीपूर्वीचे काँग्रेसमय वातावरण, सुरेश भोयर यांच्या विजयाबाबत व्यक्त झालेला विश्वास, त्यानंतर बावनकुळे यांचा ४० हजार ९४६ मतांनी झालेला विजय, राहुल गांधींच्या बोगस मतदारांबाबतच्या कथित उल्लेखाची झालेली चर्चा आणि आता १ लाख ३८ हजार ९०४ मतदारांची प्रारूप यादीतील वगळणी—या संपूर्ण घटनाक्रमामुळे कामठीच्या मतदारसंघातील निवडणूक गणित पुन्हा चर्चेत आले आहे.
४० हजार ९४६ मतांचा विजयाचा फरक आणि १ लाख ३८ हजार ९०४ मतदारांची प्रारूप यादीतील वगळणी—या दोन आकडेवारीतील तब्बल ९७ हजार ९५८ची तफावत आता कामठीच्या राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे.





