-प्रत्येकाने एक झाड लावून जगवावे – नगराध्यक्ष अजय अग्रवाल
कामठी :- वृक्ष संवर्धन सप्ताह अंतर्गत कामठीत ठिकठिकाणी भव्य वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. नगराध्यक्ष अजय अग्रवाल व येरखेडा नगर पंचायतचे नगराध्यक्ष राजकीरण बर्वे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
यावेळी नगराध्यक्ष अजय अग्रवाल तसेच येरखेडा नगर पंचायत चे नगराध्यक्ष राजकीरण बर्वे यांनी स्वतः वृक्षारोपण करून शहराला स्वच्छ, सुंदर आणि हिरवेगार बनविण्यासाठी नगर परिषद कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली. वाढते जागतिक तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व वृक्षसंवर्धन हा एकमेव प्रभावी मार्ग असल्याचे नगराध्यक्ष अजय अग्रवाल आणि नगराध्यक्ष राजकीरण बर्वे यांनी नमूद केले.
“प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा. केवळ वृक्षारोपण करून न थांबता झाडे जगविण्यावर भर दिल्यासच हरित कामठीचे स्वप्न साकार होईल,” असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात उपस्थितांनी मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण केले. प्रशासनातील दैनंदिन जबाबदाऱ्यांसोबत पर्यावरण संरक्षणाची सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आला. राबविण्यात आलेले हे वृक्षारोपण अभियान पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून, ‘ग्रीन सिटी कामठी ‘ साकार करण्याच्या नगर परिषदेच्या संकल्पाला बळ देणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. पर्यावरणपूरक व शाश्वत विकासाचा संदेश देणारा हा उपक्रम कामठी शहरासाठी प्रेरणादायी ठरला.




