– डीजेमुक्त गणेशोत्सवाचा निर्णय घेणाऱ्या मंडळांचा सत्कार; रेकॉर्डवरील ३८ गुन्हेगारांना अवैध धंदे बंद करण्याची समज
हंसराज,भंडारा कारधा :- आगामी गणेशोत्सव शांततेत आणि शिस्तीत पार पाडण्यासाठी कारधा पोलीस ठाण्यात १२ सप्टेंबर रोजी शांतता समिती, गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि डीजे चालकांची विशेष बैठक घेण्यात आली. अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि सहायक पोलीस अधीक्षक तेजस सारडा यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली. यावेळी परिसरातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि डीजे मालक उपस्थित होते.
उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन अधिकाऱ्यांनी केले. ध्वनीक्षेपक आणि डीजेचा वापर शासनाने ठरवून दिलेल्या वेळेत व आवाजाच्या मर्यादेतच करावा, तसेच वाहतुकीस अडथळा होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, यंदाचा गणेशोत्सव पूर्णपणे डीजेमुक्त साजरा करण्याचा निर्णय घेतलेल्या मांडवी आणि बासोरा येथील गणेश मंडळांचे अध्यक्ष तसेच संबंधित पोलीस पाटलांचा बैठकीत पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील ३८ गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. त्यांना सर्व प्रकारचे अवैध धंदे तातडीने बंद ठेवण्याची समज देण्यात आली असून, गैरकृत्यात आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला. या बैठकीस कारधा पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार उपस्थित होते. गणेशोत्सव काळात नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





