spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कारधा पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड; सव्वा लाखांच्या मुद्देमालासह ७ जणांवर गुन्हा

– सितेपार शिवारात पोलिसांची कारवाई; रोख रक्कम, दुचाकी आणि मोबाईल जप्त

हंसराज, कारधा (भंडारा) :- तालुक्यातील सितेपार शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर कारधा पोलिसांनी छापा टाकून रोख रकमेसह दुचाकी व तीन मोबाईल असा एकूण १ लाख २८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सात संशयितांसह इतर दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, खनारी ते सितेपार डांबरी रस्त्यावरील सितेपार शिवारात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार केंद्रे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाड टाकली असता काही व्यक्ती जुगार खेळताना मिळून आल्या.

या प्रकरणी शुभम विनोद आतीलकर (वय २५, रा. माटोरा), सूर्यभान आनंदराय पंचघरे (वय ३६, रा. सिरोपार), रतन श्यामराव पंचारे (वय २३, रा. माटोरा), रत्नशील अरविंद गजभिये (वय २९, रा. सितेपार), यश यादवराव बागडे (वय २४, रा. सितेपार), निकेश शेंडे (वय ३८, रा. माटोरा), नंदलाल रामदास मेश्राम (वय ४२, रा. सितेपार) आणि इतर दोन अनोळखी इसमांवर कारवाई करण्यात आली आहे.

कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातून ३ हजार २०० रुपयांची रोख रक्कम, ५० रुपये किमतीचे ताश पत्ते, ८० हजार रुपये किमतीची एक होंडा शाइन मोटारसायकल (क्रमांक MH 36 AP 8942), प्रत्येकी १५ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल फोन (एक मोटोरोला व दोन विवो) आणि ५०० रुपये किमतीची कापडी ताडपत्री असा एकूण १ लाख २८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कारधा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ७१०/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केंद्रे, बेदरकर, डोरले, शहारे तसेच पोलीस शिपाई गडदे, गायधने व सुरनर यांनी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास कारधा पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.