यवतमाळ, दि. २९ : मेरा युवा भारत कार्यालयाच्यावतीने अमोलकचंद महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना येथे कारगिल विजय दिवस व भाषण स्पर्धा तसेच शहिद सैनिकांच्या नावाने वृक्ष लागवड तसेच माजी सैनिकांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाकरीता अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भांडवलकर, मेरा युवा भारत कार्यालयाचे अनिल ढेंगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शशिकांत राठोड, प्रा. रुपेश मुद्दलेवार, प्रा. प्रविण जाधव, प्रा. वानखडे उपस्थित होते.
यावेळी माजी सैनिक प्रा.संजय पंदिलवार यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा.भांडवलकर यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. प्रा.पंदिलवार यांनी कारगिल लढाईमध्ये भारतीय शुर सैनिकांनी कशा प्रकारे शौर्य लढाई जिंकली याबाबत सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भांडवलकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेरा युवा भारतचे अनिल ढेंगे यांनी केले व कारगिल दिवसाचे महत्त्व सांगून भाषण स्पर्धा व एक वृक्ष शहिदांच्या नावे का लावण्यात येत आहे, याबाबत माहिती दिली.
कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित भाषण स्पर्धेत 19 युवक, युवतींनी सहभाग घेतला होता. स्पर्धा कारगिल विजयाची शौर्यगाथा या विषयावर घेण्यात आली. परिक्षक म्हणून प्रा. प्रविण जाधव, प्रा. संजय पंदिलवार, प्रा. सरिता सिंधी यानी मोलाची भुमिका बजावली. भाषण स्पर्धेत प्रथम क्रमांक वंश पत्तीवार, द्वितीय क्रमांक सलोनी जाधव, तृतीय क्रमांक सृष्टी कौरझरे यांनी पटकाविला. विजयी स्पर्धकाला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
त्यांनतर शहिद झालेल्या सैनिकांच्या नावाने वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुचिता वानखडे यांनी केले. यशस्वीतेसाठी मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, कार्यक्रम अधिकारी अनिल ढेंगे व मनिष आडे, रवि शेळके तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. शशिकांत राठोड व प्रा. रुपेश मुलेवार यांनी सहकार्य केले.




