महिला सक्षमीकरणसाठी खेतानी फाउंडेशनच्या वतीने भव्य दांडिया उत्सवाचे आयोजन

0
149

सुरज बंडीवार, पांढरकवडा :- खेतानी फाउंडेशन, पांढरकवडा यांच्या वतीने “दांडियाच्या तालावर २०२५” या भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय सांस्कृतिक सोहळा दिनांक २७, २८ व २९ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजतापासून माऊली सेलिब्रेशन हाॅल पांढरकवडा येथे रंगणार असून, यामध्ये परीसरातील नागरिक, तरुणाई व महिला वर्गाच्या सहभागाने एक वेगळीच सांस्कृतिक उर्जा अनुभवायला मिळणार आहे. या आयोजनाचे मुख्य संदेश “जागर नारीशक्तीचा, आदर भारतीय संस्कृतीचा” असा असून, पारंपरिक दांडिया व गरबाच्या माध्यमातून महिलाशक्तीचे महत्त्व अधोरेखित केले जाणार आहे. प्रत्येक स्पर्धकाला आकर्षक वैयक्तिक गिफ्ट तसेच प्रेक्षकांसाठी दररोज अल्पोपहाराची विशेष व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी मोठ्या प्रमाणात आकर्षक बक्षिसांची तरतूद करण्यात आली आहे. गृप डान्स मध्ये प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या चमुला १,११,१११ रुपये व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक ८८,८८८ रुपये व ट्रॉफी, तृतीय क्रमांक ६६,६६६ रुपये व ट्रॉफी सह विशेष पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेकरीता ऑफलाइन नोंदणी खेतानी फाउंडेशन कार्यालय बिरसा मुंडा चौक, पांढरकवडा येथे सुरू असून नोंदणी करीता सोनाली ताडूरवार (८०१०३६९३७१) व हर्षा सीडाम (९०२२६८७३४१) यांच्याशी संपर्क करावा. पांढरकवड्यातील नागरिकांनी व परिसरातील तरुणाईने मोठ्या संख्येने या सांस्कृतिक सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन खेतानी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.