– बसपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांच्यावर पुन्हा जबाबदारी; पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
नागपूर :- बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांची रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या प्रभारीपदी पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी त्यांच्यावर ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविली आहे. या नियुक्तीमुळे रामटेक लोकसभा क्षेत्रात बहुजन समाज पार्टीचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची विचारधारा तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी किशोर गेडाम यांना पुन्हा एकदा संधी मिळाली आहे. किशोर गेडाम हे बहुजन समाज पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते असून, पक्षाच्या संघटनात्मक कार्यासह सामाजिक क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. पक्षाच्या कार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या आणि सामाजिक प्रश्नांबाबत कार्यरत असलेल्या गेडाम यांच्यावर प्रदेश नेतृत्वाने पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राच्या प्रभारीपदाची जबाबदारी देऊन पक्षाने त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा विचार केल्याचे या नियुक्तीवरून स्पष्ट होते. या नियुक्तीनंतर किशोर गेडाम उर्फ भाऊसाहेब यांनी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अँड. सुनील डोंगरे यांचे आभार मानले. पक्षाने आपल्यावर पुन्हा विश्वास दाखवून महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कार्य करू, तसेच पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी आणि बहुजन समाज पार्टीची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या नियुक्तीच्या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे राज्य महासचिव मंगेश ठाकरे, राज्य सचिव विवेक हाडके, प्रफुल मानके, जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार, जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान, रामटेक लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे दुसरे प्रभारी राजकुमार बोरकर, जिल्हा महासचिव अँड. नंदकिशोर मंडलिक तसेच नागपूर शहर युवा अध्यक्ष सुमित चव्हाण यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेडाम यांच्या पुनर्नियुक्तीमुळे रामटेक लोकसभा क्षेत्रातील बहुजन समाज पार्टीच्या संघटनात्मक कार्याला बळ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आगामी काळात संघटनवाढ, कार्यकर्त्यांशी समन्वय आणि जनतेच्या प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेण्याच्या दृष्टीने त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यांच्या नियुक्तीबद्दल पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून अभिनंदन व्यक्त करण्यात येत आहे.








