– पाच दिवसीय प्रदर्शनात तब्बल 1.20 कोटी रुपयांची उलाढाल
गडचिरोली :- गडचिरोलीच्या कृषि क्षेत्राला उभारी देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पाच दिवसीय ‘कोया कृषि कुंभ’ कृषि महोत्सवाचा समारोप अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.या महोत्सवात केवळ तंत्रज्ञानाची देवाणघेवाणच झाली नाही तर आर्थिक उलाढालीचाही एक नवा विक्रम प्रस्तापित झाला. महोत्सवाच्या समारोपप्रसंगी समोर आलेल्या माहितीनुसार या पाच दिवसीय प्रदर्शनात तब्बल 1.20 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. महोत्सवात लावलेल्या ३०० हून अधिक स्टालच्या माध्यमातून शेतकरी आणि महिला बचत गटांनी त्यांच्या उत्पादनांची थेट ग्राहकांना विक्री केली. यात प्रामुख्याने तांदूळ, रानमेवा, भरडधान्यापासून बनविलेले पदार्थ आणि हस्तकला, विविध कृषि यंत्रे व औजारे यांचा समावेश होता. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ११११ किलो नाचणीचा शिरा बनवून जागतिक विक्रम केला. या महोत्सवाला राज्य कृषि मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व बिजमाता राहीबाई पोपेरे यांची प्रमुख उपस्थिती या महोत्सवास लाभली. स्वप्नील थोरात (IFS) यांनी या महोत्सवाला भेट देऊन माहिती जाणून घेतली. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महोत्सवाला वेळोवेळी भेटी देऊन मार्गदर्शन केले. खरेदीदार विक्रेता मेळाव्यामुळे स्थानिक शेतकरी बचत गट व उत्पादक कंपन्यांना लाभ झाला. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पशुसंवर्धन,कृषि आधारीत उद्योग निर्मिती व शासकीय योजना विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केवळ पारंपारिक शेतीवर अवलंबून न राहता कुक्कुटपालन आणि इतर कृषी आधारित उद्योगांची कास धरण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मुकुंद कदम, सहाय्यक प्राध्यापक माफसू नागपूर यांनी केले. महोत्सवातील तांत्रिक सत्रात कुक्कुटपालनावर विशेष मार्गदर्शन करत, बचत गटामार्फत कुक्कुटपालन व्यवसाय करावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले. तसेच कुक्कुट पक्षांचे संगोपन, लसीकरण, खाद्य व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, अंडी उत्पादन आणि विपणन याविषयी माहिती उपस्थित शेतकऱ्यांना देण्यात आली.

दुसऱ्या सत्रात, केवळ पीक उत्पादन न घेता त्यावर लघु प्रक्रिया उद्योग उभारण्यावर सनदी लेखापाल समीर म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. तांदूळ, मिरची, मसाले,महफूल, चारोळी ई. स्थानिक उत्पादनावरच लघु उद्योग सुरू करावा असे मत त्यांनी यावेळी मांडले. हे उद्योग स्थापन करण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य मिळत असल्याचे सांगून, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क प्रकल्प, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व कृषी संजीवनी योजना यांसारख्या योजनांचा त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. तसेच सदर योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाच्या संपर्कात राहण्याचे आवाहन केले.
यावेळी ज्या शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शेतात नवनवीन प्रयोग राबवून ते यशस्वी केले अशा शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यामध्ये,दिलीप तुळशीराम भुरसे, किशोर विठ्ठल चापले, सतीश बापूजी ताजणे, प्रकाश काशीराम भोयर, महेश मोतीराम दिवटे, सुधाकर धोंडोजी धोटे, सुमारो बालमुकुंद यादव, राजू दशरथ सिडाम, संदीप काटिया मट्टामी, डोको दागो मटामी, बोरा केहेका पुंगाटी व रामकोटया गोविंदराव वेदांत या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सत्कार समारंभास परिविक्षाधीन आय ए एस अधिकारी, अभिषेक वशिष्ठ, अभिषेक सेहरा, आशुतोष शुक्ला, हिमांशू भास्कर, शक्ती दुबे, टीना कल्यान, तेजस्व, थनीगैरासन टी.अभी जैन , प्रकल्प संचालक आत्मा तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रिती हिरळकर व तहसीलदार संतोष आष्टीकर हे उपस्थित होते. या महोत्सवाला गडचिरोली जिल्ह्यासह शेजारील जिल्ह्यातील जवळपास 80 हजार शेतकऱ्यांनी भेट दिली यामध्ये विशेषतः महिला बचत गटांचा सहभाग लक्षणीय होता.
या महोत्सवाने जिल्ह्यातील शेतकरी आणि आदिवासी बांधवाना आधुनिक शेतीचे नवे तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची नवी दिशा दाखवून दिली. हा महोत्सव केवळ प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता गडचिरोलीच्या उत्पादनांना ‘ लोकल ते ग्लोबल नेण्यासाठी एक भक्कम पाया ठरला आहे.
– प्रिती हिरळकर प्रकल्प संचालक (आत्मा), गडचिरोली.








