– कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार
नागपूर :- कृष्णम नगरी युवा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला गणेशोत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला. गणरायाच्या आशीर्वादाने आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण उत्सवाला विशेष उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या या सोहळ्यात सहभागी झालेल्या नागरिक, भाविक, महिला, युवक तसेच लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली. नागरिकांनी दाखविलेला उत्साह, प्रेम आणि सहकार्य यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांना मोठी प्रेरणा मिळाली. मंडळाच्या वतीने सर्वप्रथम विघ्नहर्त्या श्री गणरायाचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. बाप्पाच्या कृपेने आणि आशीर्वादाने संपूर्ण गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला. गणेशोत्सवाच्या आयोजनामागे मंडळातील युवा कार्यकर्त्यांची मोठी मेहनत होती. कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्थापन, सजावट, भाविकांची व्यवस्था तसेच विविध उपक्रमांचे आयोजन यासाठी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले. या उत्सवाच्या यशामागे मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांची एकजूट आणि नियोजनबद्ध कार्यपद्धती महत्त्वाची ठरली. कोणत्याही अडचणीची पर्वा न करता कार्यकर्त्यांनी जबाबदाऱ्या सांभाळत उत्सव यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. त्यांच्या या मेहनतीचे नागरिकांकडूनही कौतुक करण्यात आले. तसेच, गणेशोत्सवाच्या आयोजनासाठी आर्थिक, मानसिक तसेच प्रत्यक्ष स्वरूपात सहकार्य करणाऱ्या सर्व देणगीदार, हितचिंतक आणि नागरिकांचे मंडळाच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. त्यांच्या सहकार्यामुळे उत्सव अधिक भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करता आला. नागरिकांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. ‘नागरिकांचे प्रेम आणि सहकार्य हीच आमची खरी ताकद’ असून, यापुढेही कृष्णम नगरी युवा गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचा मानस मंडळाच्या वतीने व्यक्त करण्यात आला. गणेशोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे योगदान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मंडळाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. श्री गणरायाची कृपादृष्टी सर्वांवर कायम राहो आणि समाजात एकोपा, बंधुभाव व सद्भावना वाढीस लागो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली असून दिनेश मधुकराव टेकाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.



