आदर्श शिक्षक पुरस्काराने वसंत पिसे यांचा गौरव; कान्होलीत अभिनंदनाचा वर्षाव

0
7

कान्होली, ता.हिंगणा :- जि.प.प्राथमिक शाळा, कान्होली (गुमगाव केंद्र) येथील मुख्याध्यापक वसंत रामचंद्र पिसे यांना उत्कृष्ट शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न आणि समर्पित सेवाभावाची दखल घेत आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सन्मानानंतर कान्होली गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांकडून पिसे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उंचावली असून विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासह संस्कारमूल्येही रुजत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. याप्रसंगी उपसरपंच मिलिंद रमेश कोवे यांनी पिसे यांचा सत्कार केला आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी ग्रामपंचायत सदस्या सुनीता वलके, दिपाली वलके, दिपाली करपते, मीना कोवे, आंचल कोवे, तसेच निता रंदई, अरविंद उईके, प्रदीप इटणकर, विकास करपते, नंदू कुमरे, भावेश वलके, मंगल कोवे, अरविंद कोवे, राज कळंबे, गौरव गोंडगे यांच्यासह गावातील विविध मान्यवर, पालक व नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी पिसे यांचे अभिनंदन करून हा सन्मान संपूर्ण कान्होली गावासाठी अभिमानाची बाब असल्याची भावना व्यक्त केली.