१७ दिवसांच्या झुंजीनंतर कुणाल डोकरीमारेचा मृत्यू, दोन वर्षांच्या चिमुकलीचे पितृछत्र हरपले

0
56

– मोहाडीत डीजे वादातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्याने मोहगाव (देवी) सुन्न; आरोपींवर आता खुनाचा गुन्हा?

हंसराज,प्रतिनिधी भंडारा मोहाडी :- तालुक्यातील मोहगाव (देवी) येथे डीजे लावण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या रक्तरंजित संघर्षाने अखेर एका तरुणाचा बळी घेतला आहे. गेल्या १७ दिवसांपासून नागपूर येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देणाऱ्या कुणाल विठोबा डोकरीमारे (वय २४) या तरुणाची प्राणज्योत अखेर मालवली. २० मार्च रोजी कुणालच्या मृत्यूची बातमी गावात धडकताच संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून, एका दोन वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यावरून पितृछत्र हरपल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेची पाळेमुळे ३ मार्च २०२६ रोजी घडलेल्या वादात आहेत. मोहगाव (देवी) येथे नितीन साखरवाडे आणि नरेंद्र बांते यांच्यात डीजे लावण्यावरून वाद झाला होता. या वादात कुणाल डोकरीमारे याने मध्यस्थी केली होती. हीच मध्यस्थी आरोपी मैनेश बुधे (३०) आणि रामप्रकाश पेलने (२३) यांना चांगलीच खुपली. याच रागातून आरोपींनी कट रचून ३ मार्च रोजी दुपारी १:३० वाजता कुणाल आणि त्याचा मित्र आयुष बावणकर यांना ‘अपना बार अँड रेस्टॉरंट’ परिसरात बोलावले. तिथे काही कळण्याच्या आतच आरोपींनी चाकू आणि गुप्तीने कुणालवर सपासप वार करून त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडले. या हल्ल्यात आयुष बावणकर हा सुद्धा जखमी झाला होता.

घटनेनंतर गंभीर जखमी कुणालला तातडीने प्रथमोपचार करून नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्याच्यावर अनेक शस्त्रक्रिया करण्यात आल्या, मात्र जखमा खोल असल्याने त्याची प्रकृती खालावत गेली. २० मार्च रोजी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. १७ दिवस चाललेली त्याची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली.

मृतक कुणाल हा कुटुंबाचा मोठा आधार होता. त्याचे आई-वडील शेतीकाम करून संसाराचा गाडा ओढतात. त्याचा एक भाऊ वरठी येथील सनफ्लॅग आयर्न फॅक्टरीमध्ये कामाला आहे. कुणालच्या पश्चात त्याची पत्नी आणि अवघ्या दोन वर्षांची चिमुकली मुलगी आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने आणि चिमुकलीचे पितृछत्र हरपल्याने डोकरीमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यापूर्वी मोहाडी पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०९ (खुनाचा प्रयत्न) अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता कुणालचा मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात कलम १०३ (खून) ची वाढ केली जाणार आहे. पोलीस उपनिरीक्षक राहुल चौधरी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.