‘अतिक्रमण नियमाकुल करा, अन्यथा पोटनिवडणुकीवर बहिष्कार’; हरदोली (सि.) येथील नागरिकांचा तुमसर तहसीलदारांना निर्वाणीचा इशारा

0
42

– वार्ड क्र. १ मधील पोटनिवडणुकीवर संकटाचे सावट; शासकीय योजनांच्या लाभासाठी ग्रामस्थ आक्रमक, प्रशासनाला सादर केले निवेदन

हंसराज,प्रतिनिधी भंडारा सिहोरा :- शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे, अन्यथा आगामी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्यात येईल, असा आक्रमक पवित्रा तुमसर तालुक्यातील हरदोली (सि.) येथील नागरिकांनी घेतला आहे. यासंदर्भात २० मार्च रोजी तुमसरचे तहसीलदार उपेश अंबादे यांना हिरालाल नागपुरे आणि धर्मेंद्र उर्फ बालू कटरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी निवेदन सादर केले.

तुमसर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हरदोली (सि.) ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र. १ मधील एका रिक्त जागेसाठी २८ एप्रिल रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे, याच वार्डातील दोन सदस्यांना यापूर्वी ‘अतिक्रमणा’चा ठपका ठेवून अपात्र ठरविण्यात आले होते. आता याच मुद्द्यावरून वार्डातील नागरिक संतप्त झाले आहेत.

आमचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात यावे जेणे करून आम्हाला शासकीय योजनेचा अधिकृतरित्या लाभ घेता येईल व निवडणुकीत सुद्धा सहभाग घेता येईल असे या निवेदनात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.शासकीय जागेवरील आमचे अतिक्रमण नियमाकुल करण्यात आले नाही,शासकीय योजनेचा भाग घेता येणार नाही, आमचा व आमच्या वार्डाचा नेतृत्व करणारा कोणी नसेल तर आम्ही निवडणुकीत भाग न घेता निवडणुकीवर बहिष्कार कां करू नये असा खरमरीत इशारा सुद्धा या गावातील व वार्डातील नागरिकांनी या निवेदनातून दिला आहे.

28 एप्रिल रोजी ज्या वार्डाची पोटनिवडणूक होत आहे त्याच वार्डात 130 ते 150 पर्यंतचा कुटुंब हाच मतदाता सुद्धा आहे आणी त्याच वार्डातील पदाधिकाऱ्यावर अतिक्रमणाचा ठपका ठेवीत अपात्र ठरविण्यात आले होते हे सत्य नाकारता येत नाही.

या निवेदनाच्या प्रती राज्याचे मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी भंडारा आणि गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित पोलीस स्टेशनलाही पाठवण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवेळी हिरालाल नागपुरे, धर्मेंद्र उर्फ बालू कटरे यांच्यासह वार्डातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आता या इशाऱ्यानंतर प्रशासन अतिक्रमणाबाबत काय पावले उचलते आणि २८ एप्रिलची निवडणूक सुरळीत पार पडते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.