हंसराज,भंडारा लाखनी :- भाजी आणण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर जबरदस्तीने अत्याचार करून तिला चार महिन्यांची गरोदर करणाऱ्या ५० वर्षीय नराधमास लाखनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रतनलाल उर्फ जागेश्वर सुरचंद कुळमते (वय ५०, रा. गांधीनगर, कनेरी/दगडी, ता. लाखनी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याची रवानगी भंडारा जिल्हा कारागृहात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही संतापजनक घटना डिसेंबर २०२५ मध्ये दुपारच्या सुमारास घडली. पीडित १३ वर्षे १० महिने वयाची मुलगी आरोपी रतनलाल कुळमते याच्या घरी भाजी मागण्यासाठी गेली होती. ती मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असूनही आरोपीने तिचा विनयभंग करून तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच या घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या अत्याचारामुळे पीडित मुलगी ४ महिन्यांची गरोदर राहिली. ही बाब उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या नातेवाईकांनी लाखनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांची तातडीने कारवाई तक्रार प्राप्त होताच आणि वैद्यकीय अहवालावरून लाखनी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा नोंदवला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ६४ (१), ६५ (१), ३५१ (३) सह बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (पोक्सो) २०१२ च्या कलम ४ आणि ६ अन्वये गुन्हा (अप. क्र. २३६/२०२६) दाखल करण्यात आला.
पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांच्या नेतृत्वाखाली शोध पथकाने आरोपीचा माग काढून त्याला तातडीने अटक केली. सुरुवातीला आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. सद्यस्थितीत आरोपीची रवानगी भंडारा जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.
यांच्या मार्गदर्शनाखाली झाला तपास सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी (साकोली) शिवम विसापूरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस हवालदार अमितेश वडेटवार आणि पोलीस शिपाई प्रशांत धकाते यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे.