खापा, वार्ताहर :- परिस्थितीशी दोन हात करीत भविष्याचा सूर्य शोधण्यासाठी जंगलातून मार्गक्रमण करीत यशाची वाट शोधणारी मुलगी म्हणजे सावनेर तालुक्यात कला शाखेत अव्वल ठरलेली कांचन मनोहर बिसरे होय. कांचनने बारावी बोर्ड परीक्षेत ८२.५० टक्के गुण प्राप्त करून तालुक्यात पहिला येण्याचा मान पटकावला.
कांचनचा जन्म सावनेर तालुक्यातील रायवाडी सारख्या चहुबाजूने जंगलाने वेढलेल्या लहानशा गावात झाला. लहानपणापासूनच हुशार होती. तिचे माध्यमिक शिक्षण बडेगाव येथील लोकमान्य शाळेतून झाले. दहावी बोर्ड परीक्षा लोकमान्य शाळा बडेगाव येथून उत्तीर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने कांचनच्या स्वप्नांना पंख फुटू लागले. घरची परिस्थिती बेताचीच. घरी फक्त एक एकर जमीन. कांचन तीन बहिणींमध्ये सर्वात लहान. वडील बेलदारीचे काम करीत व आई हात मजुरी. अशा परिस्थितीत सुटीच्या दिवशी अधून मधून कांचनही आपल्या आई सोबत शेतात जात असे. अशा परिस्थितीतही मात्र कांचनने जीवनात मोठं होण्याचं स्वप्न उराशी बाळगलेलं होतं. त्यामुळेच तिने खापा येथे जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उच्च माध्यमिक शिक्षण घेण्याचे ठरविले. गावची परिस्थिती अतिशय बिकट होती. गावला एसटी बस फक्त दोन वेळा. खापाला ये-जा करीत प्रचंड मेहनत आणि कष्टाच्या बळावर तिने बारावी बोर्ड परीक्षेत हे यश संपादन केलेले आहे.
रोज महाविद्यालयाला सुट्टी झाल्यानंतर गावी जाताना घरापर्यंत बस नसायची. यावेळी रायवाडी फाट्यावरून जंगलातून भविष्याची वाट शोधत पायदळी रोज ४ किलोमीटर प्रवास करावा लागत असे. वाटेत खेकरानाला धरण सारखे पर्यटन स्थळ असल्यामुळे मौज मजा करण्यासाठी आलेल्या रिकाम टेकड्या तरुणांची झुंबड ही नेहमीचीच. जीव मुठीत घेऊन जंगलातील हा प्रवास रोजचाच होता. अशा परिस्थितीत नियतीशी दोन हात करीत कांचनने कलाशाखेत तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कारही करण्यात आला. तिच्या डोळ्यात आता मोठी स्वप्ने आहेत. भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊन मोठे प्रशासकीय अधिकारी होण्याचा तिचा निर्धार आहे. मात्र तिच्या या स्वप्नांच्या वाटेवर आर्थिक अडचणीचे मोठे हिमालय उभे आहे.