– पंधरा दिवसांपासून मोजणीची प्रक्रिया ठप्प; हजारो प्रकरणे प्रलंबित
– नोटिसा मिळूनही प्रत्यक्ष मोजणी नाही! भूमी अभिलेख विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह; नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ
संदीप कांबळे, कामठी :- कामठी तालुक्यात जमीन मोजणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, कामठी येथील भूमी अभिलेख कार्यालया कडून मोजणीची प्रक्रिया खोळंबल्याने जमीनधारक, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. जमीन मोजणीसाठी अर्ज करून कार्यालयाकडून नोटिसा मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष मोजणी होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना आर्थिक भुर्दंडासह मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक अडचणींमुळे मोजणीची कामे रखडत असल्याने प्रलंबित प्रकरणांचा निपटारा कधी होणार, असा सवाल येथील त्रस्त मोजनिधारक अर्जदार करीत आहेत.
कामठी तालुक्यातील अनेक जमीनधारकांना आपल्या जमिनीची हद्द निश्चित करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडे धाव घ्यावी लागते. शेतजमिनीची हद्द कायम करणे, अतिक्रमण मोजणी, पोटहिस्सा मोजणी, हद्द निश्चिती तसेच शहरातील सिटी सर्व्हेअंतर्गत मोजणी अशा विविध कामांसाठी नागरिक अर्ज करतात.त्यानुसार कामठी च्या भूमी अभिलेख विभागाकडे मागील काही दिवसापूर्वीपासून काही अर्जदारांनी मोजनीचे अर्ज केले मात्र , अर्ज करूनही निर्धारित वेळेत मोजणीची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने संबंधित नागरिकांची कामे रखडलेली आहेत
मोजणीसाठी नोटिसा मिळाल्यानंतर नागरिक आवश्यक कागदपत्रांची तयारी करून नियोजित दिवशी संबंधित ठिकाणी उपस्थित राहतात. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे मोजणी होऊ शकली नाही, त्यामुळे त्यांना पुन्हा पुढील तारखेची प्रतीक्षा करावी लागली परिणामी, कार्यालयीन प्रक्रियेसाठी केलेला खर्च, प्रवासाचा वेळ आणि श्रम वाया जाण्याची वेळ नागरिकांवर आली.जमीन मोजणीच्या प्रक्रियेत आधुनिक तांत्रिक यंत्रणेला महत्त्वाचे स्थान आहे. संबंधित ‘कॉर्स’ यंत्रणेतील अडचणींमुळे मोजणीची कामे प्रभावित होत असल्याचे वृत्त आहे. ही यंत्रणा बंद असल्याने त्याचा परिणाम मोजणीच्या नियोजनावर आणि प्रलंबित अर्जांच्या निपटाऱ्यावर झाला आहे तेव्हा, कामठी तालुक्यातील मोजणीची प्रलंबित कामे , तांत्रिक अडचणींचे स्वरूप काय आहे आणि मोजणीची प्रक्रिया पूर्ववत सुरू होण्यासाठी किती कालावधी लागणार, याबाबत संबंधित विभागाकडून अधिकृत माहिती अनुत्तरित आहे. स्पष्ट माहितीच्या अभावामुळे अर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे
शेतजमिनीच्या बांधावरून होणारे वाद, अतिक्रमणाचे प्रश्न आणि वारसाहक्काने झालेल्या जमीनवाटणीतील मतभेद यांचा निपटारा करताना अधिकृत मोजणी महत्त्वाची ठरते. जमिनीची हद्द निश्चित नसल्यास दोन जमीनधारकांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात. तसेच जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार, पोटहिस्सा निश्चिती आणि इतर प्रशासकीय कामांसाठीही मोजणीची आवश्यकता भासते. त्यामुळे मोजणी प्रक्रिया रखडल्याचा परिणाम केवळ शेतकऱ्यांपुरता मर्यादित न राहता इतर जमीनधारकांनाही होतो.
भूमी अभिलेख कार्यालयातील मोजणी प्रक्रियेकडे नागरिक मोठ्या अपेक्षेने पाहतात. अर्ज केल्यानंतर निर्धारित कालावधीत मोजणी होईल, अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र, मोजणीची तारीख मिळूनही काम पूर्ण झाले नसल्याने , तर पुढील तारखेसाठी पुन्हा कार्यालयाशी संपर्क साधावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच आर्थिक भारही वाढत आहे.
विशेषतः शेतीची कामे, जमीनवाटणी किंवा इतर महत्त्वाचे व्यवहार मोजणीवर अवलंबून असलेल्या नागरिकांना विलंबाचा अधिक फटका बसू शकतो. त्यामुळे मोजणी प्रक्रियेतील अडथळे दूर करून अर्जदारांना वेळेत सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.कामठी तालुक्यातील जमीन मोजणीच्या प्रश्नावर संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. तांत्रिक अडचणी दूर करून मोजणीची यंत्रणा सुरळीत करणे, प्रलंबित अर्जांचा आढावा घेणे आणि मोजणीचे सुधारित वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक आहे.
यापूर्वी मोजणीसाठी नोटिसा मिळालेल्या नागरिकांना नव्या तारखांची माहिती वेळेत देण्यात यावी. तसेच, मोजणीची कामे कोणत्या कारणांमुळे रखडली आहेत आणि ती पूर्ववत सुरू करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत, याबाबतही विभागाने स्पष्टता द्यावी
एकूणच, कामठी तालुक्यातील जमीन मोजणीची प्रक्रिया सुरळीत करून प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे आव्हान भूमी अभिलेख विभागासमोर आहे. नागरिकांना वारंवार कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागू नयेत आणि जमीन मोजणीसारखी महत्त्वाची सेवा वेळेत मिळावी, यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.








