spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मान्सूनपूर्व वीज कामांमध्ये हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही – जिल्हाधिकारी

– संवेदनशील ठिकाणी तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्याचे निर्देश

गडचिरोली :- गडचिरोली हा दुर्गम व आदिवासीबहुल जिल्हा असून पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे तक्रारींची वाट न पाहता महावितरणने सक्रियपणे काम करावे. मान्सूनपूर्व देखभालीतील कोणतीही दिरंगाई किंवा हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही अशा कडक सूचना देत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीची कामे ६० टक्क्यांपेक्षा कमी पूर्ण झालेल्या विभागांतील जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वीज वितरण व पारेषण व्यवस्थेच्या सज्जतेचा आढावा जिल्हाधिकारी यांनी आज घेतला. यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता ए.ए. लोमसे, Prakash खांडेकर, कार्यकारी अभियंता हितेश पारेख, जे. एच. वाघमारे व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सिरोंचा तालुक्याचा संपूर्ण वीजपुरवठा सध्या अल्लापल्ली ते सिरोंचा या सुमारे ९५ किलोमीटर लांबीच्या ६६ केव्ही वाहिनीवर अवलंबून आहे. या वाहिनीचा मोठा भाग घनदाट जंगलातून जात असल्याने वादळ-वाऱ्यात झाडे कोसळून वारंवार व्यत्यय निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर जिमलगट्टा येथे तसेच अशी परिस्थिती उद्भवणारे इतर ठिकाणी चेन-सॉ कटर, वाहने व अन्य आवश्यक उपकरणांसह समर्पित विशेष पथक कायमस्वरूपी तैनात करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच संवेदनशील ठिकाणांचे मॅपिंग करून तातडीने प्रतिसाद देणारी यंत्रणा उभारण्यावर भर देण्यात आला.

सिरोंचाच्या वीज समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून तेलंगणातील kistampeth येथून सिरोंचापर्यंत १३२ केव्ही वीज वाहिनी उभारण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सिरोंचा भागाला पर्यायी व अधिक सक्षम वीजपुरवठा उपलब्ध होणार असून वारंवार होणाऱ्या खंडिततेत मोठी घट अपेक्षित आहे. त्यामुळे हे काम डिसेंबर २०२६ पूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

बैठकीत अंकिसा, बामणी, कारसपल्ली, घोट, येनापूर, आरमोरी आणि आमिर्झा या जास्त व्यत्ययग्रस्त फीडर्सचा विशेष आढावा घेण्यात आला. अशा फीडर्सचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पालकत्व स्वीकारून त्यावरील व्यत्यय कमी करण्यासाठी विशेष कृती आराखडा राबवावा, असे निर्देश देण्यात आले. भामरागड परिसरातील घनदाट जंगलातून जाणाऱ्या लाईनवरील जुन्या इन्सुलेटर्सच्या जागी पॉलिमर इन्सुलेटर्स बसविण्याचे कामही गतीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

नागरिकांच्या तक्रारींच्या तात्काळ निवारणासाठी महावितरणने विविध उपकेंद्रांचे संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिले असून सिरोंचा स्विचयार्ड (9403349011), जिमलगट्टा उपकेंद्र (9423699673), अल्लापल्ली (7875022895 / 8806490605), चामोर्शी (7875016679), गडचिरोली (7875153067)आणि एटापल्ली (8956137395) येथे संपर्क साधता येणार आहे.

बैठकीला महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते आणि संबंधित तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles