spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मोर्शी विधानसभा मतदारसंघात ड्रग्स एमडी गांजाचा शिरकाव! 

– युवा पिढीला वाचवण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा ! 

– माजी आमदार देवेंद्र भुयार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कठोर कार्यवाहीची मागणी !

वरूड तालुका प्रतिनिधी :- मोर्शी विधानसभा मतदारसंघात वरूड मोर्शी तालुक्यामध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्या ड्रग्स एमडी गांजाच्या विळख्यामुळे तरुण पिढीचे भविष्य धोक्यात येत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. शहरासह ग्रामीण भागातही ड्रग्स एमडी गांजा या अमली पदार्थांचा वापर आणि त्याची विक्री वाढत असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत असून पालक, शिक्षक आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्य शासन व पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधत मोर्शी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या ड्रग्सच्या अवैध साखळीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. देवेंद्र भुयार यांनी म्हटले आहे की, तरुणाई ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. मात्र वाढत्या व्यसनाधीनतेमुळे अनेक युवकांचे शिक्षण, करिअर आणि कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे केवळ किरकोळ आरोपींवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर या अवैध व्यवसायामागील मुख्य सूत्रधार आणि पुरवठादारांपर्यंत पोहोचून त्यांचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त करणे आवश्यक आहे.

यावेळी मोर्शी विधानसभा मतदारसंघात विशेष एमडी गांजा ड्रग्सविरोधी मोहीम राबवावी. शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी नियमित तपासणी करावी. ड्रग्स विक्रेते व पुरवठादारांवर कठोर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करावेत. युवकांमध्ये जनजागृती अभियान राबवून व्यसनमुक्ती केंद्रांना बळ द्यावे. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करावा. युवा पिढीचे भविष्य वाचविण्यासाठी निर्णायक लढा आवश्यक असून मोर्शी विधानसभा मतदारसंघातील वाढत्या ड्रग्सच्या संकटामुळे अनेक कुटुंबांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. वेळेवर कठोर पावले उचलली नाहीत तर भविष्यात परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासन, पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन ड्रग्समुक्त मोर्शी घडविण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे त्यामुळे “ड्रग्समुक्त मोर्शी – सुरक्षित भविष्य” यासाठी आता केवळ चर्चा नव्हे, तर कठोर आणि प्रभावी कारवाईची करण्याची मागणी माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

“मोर्शी विधानसभा मतदारसंघातील वरूड मोर्शी तालुक्यातील तरुण पिढीला ड्रग्सच्या संकटातून वाचविण्यासाठी शासनाने विशेष मोहीम राबवावी. ड्रग्स विक्री करणाऱ्या टोळ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करून या अवैध व्यवसायाचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करावे. युवा पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवणे ही शासनाची जबाबदारी आहे.”

— देवेंद्र भुयार, माजी आमदार मोर्शी विधानसभा

Popular Articles